Mamata Banarjee on CEC : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेऊन मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेबाबत तक्रार केली. ही भेट जवळपास सुमारे ९० मिनिटे चालली. परंतु, या बैठकीत निवडणूक आयुक्तांनी गैरवर्तन केल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. बैठक अर्ध्यावर सोडून त्यांनी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधत निवडणूक आयोग आणि आयुक्तांवर टीका केली.

बैठकीतून बाहेर पडताना बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितले की, “बंगालमध्ये किरकोळ स्पेलिंग बदल आणि शीर्षक बदलांमुळे मतदारांची नावे रद्द केली जात आहेत. त्यांनी प्रथम लोकांची नावे काढून टाकली. निवडणूक आयुक्त हे भाजपाचे आयटी सेल आहेत. तुम्ही म्हणता की ही लोकशाही आहे? बॅनर्जी आणि बंदोपाध्याय, मुखर्जी आणि मुखोपाध्याय, किंवा चॅटर्जी आणि चट्टोपाध्याय अशी स्पेलिंगमधील फरकांमुळेही नावे वगळली जात आहेत.”

५८ लाख मतदारांची नावे कोणत्याही चौकशीशिवाय काढून टाकण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की या तपासणीदरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांवर (बीएलओ) दबाव आणला जात होता. तसंच, अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याकांना जास्त प्रमाणात त्रास होत आहे. “अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याकांना का लक्ष्य केले जात आहे? ते मानव नाहीत का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

‘भाजपाशासित आसाममध्ये फेरतपासणी का नाही?

SIR प्रक्रिया निवडणुकांच्या तोंडावर का राबविली जात आहे. आसाममध्ये भाजपाचं सरकार आहे, तिथे ही प्रक्रिया का राबविली नाही?तुम्ही बंगाल, केरळ आणि तामिळनाडूला लक्ष्य करत आहात आणि भाजपाशासित राज्य सोडत आहात”, असाही आरोप त्यांनी केला. बॅनर्जी यांनी असा दावा केला की इतर राज्यांना जमिनीच्या नोंदी आणि माध्यमिक प्रमाणपत्रे यासारख्या कागदपत्रांचा वापर करण्याची परवानगी असताना, बंगालसाठी नियम बदलण्यात आले.

निवडणूक आयुक्तांनी गैरवर्तन केले

“हे निवडणूक आयुक्त खूप अहंकारी आहेत. आमच्याशी गैरवर्तन झाले आहे. आमचा अपमान झाला आहे”, असं म्हणत ममता बॅनर्जी बैठकीतून बाहेर पडल्या. शिष्टमंडळ न्याय मागण्यासाठी आले होते असा दावा करून बॅनर्जी म्हणाल्या, “मुख्य निवडणूक आयुक्त आम्हाला खोटे बोलले. आम्ही येथे न्यायासाठी आलो होतो पण आमच्यावर अन्याय झाला.”

त्यांनी आरोप केला की आयोगाने डुप्लिकेट मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल तृणमूल काँग्रेसला दोष देऊन एसआयआरचे समर्थन केले आणि निवडणूक आयोगावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे उल्लंघन केल्याचा आणि निवडणूक आयोगाजवळ माध्यमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा आरोप केला. “मी अशा प्रकारचे मुख्य निवडणूक आयुक्त कधीही पाहिले नाहीत,” बॅनर्जी म्हणाल्या.

निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला आरोप

दरम्यान, या बैठकीशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्तांविरोधात धमकीची भाषा वापरली. या तपासणीच्या कामात गुंतलेल्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी धमकावलं. त्यामुळे कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा या अधिकाऱ्यांनी दिला, असं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.