ज्या लोकांनी नेत्रदान केले आहे अशा लोकांच्या डोळ्यातील पेशींचा वापर जगातील अनेक अंध लोकांना दृष्टी देण्यासाठी होऊ शकतो, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. मृत व्यक्तींनी दान केलेल्या नेत्रातील म्युएलर ग्लायल सेल्स नावाच्या मूलपेशी काढून त्या पासून डोळ्याच्या मागच्या भागात असलेल्या व आपल्याला दृष्टीची संवेदना देणाऱ्या दंडपेशी तयार करून त्या उंदरांच्या डोळ्याच्या मागच्या भागात टोचल्या असता, त्यांना बऱ्यापैकी दृष्टी प्राप्त झाली, हा प्रयोग माणसात यशस्वी होण्याची जास्त शक्यता असून त्यात अंधांना निदान वाचण्यापुरती तरी दृष्टी प्राप्त होऊ शकणार आहे.
उंदरांवर करण्यात आलेल्या संशोधनात असे दिसून आले, की प्रत्येक मानवाच्या डोळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या पेशींचा वापर अंध उंदरांना काही प्रमाणात दृष्टी प्राप्त करून देण्यासाठी करता आला. माणसातही असेच निष्कर्ष दिसले, तर अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण होऊ शकेल, त्यांना निदान वाचण्यापुरती दृष्टी प्राप्त होऊ शकले असे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी म्हटले आहे. याबाबत आता तीन वर्षांत मानवावर चाचण्या सुरू होतील, संशोधकांनी म्युएलर ग्लायल सेल्स नावाच्या पेशी काढल्या त्या प्रौढ मूलपेशी म्हणतात, त्यांचे रूपांतर डोळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या पेशींमध्ये होऊ शकते, अनेक नेत्रविकारांवर या पेशींचा वापर होऊ शकतो. ब्रिटनमधील मेडिकल रीसर्च कौन्सिलचे डॉ. पॉल कोलविले-नॅश यांनी सांगितले, की म्युलर ग्लायल सेल या पेशी रेटिना विकारांवर उपयोगी ठरतात. या पेशी प्रयोगशाळेत वाढवून दंड पेशी तयार करण्यात आल्या. आपल्या डोळ्यातील रेटिनात प्रकाश ओळखण्याची ताकद या दंडपेशींमुळे येत असते. या दंडपेशी अंध उंदरांच्या डोळ्याच्या मागच्या भागात टोचून त्यांची दृष्टी तात्पुरती पुन:प्रस्थापित करता येते. आपला मेंदू डोळ्याकडून आलेले ५० विद्युत संदेश टिपत असतो. ते संदेश या पेशींमुळे पूर्ववत काम करू लागतात. मॅक्युलर डिजनरेशन किंवा रेटिनिस व पिगमेंटोसा या नेत्रविकारात या पद्धतीचा पुढे वापर करता येईल हे स्पष्ट होत आहे.