Census 2027 India live-in relationship marriage status : भारतीय जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील जनगणना एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. यंदा पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने जनगणना करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे लिव्ह इन मध्ये राहणारे जोडपे एकमेकांच्या नात्यांविषयी कशी नोंद करणार असा प्रश्न वारंवार (FAQs) विचारले जात आहे. याबाबत आता माहिती समोर आली आहे.
२०२७ च्या जनगणनेसाठी, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ज्या जोडप्यांना आपले नाते ‘स्थिर संबंध’ (stable union) असल्याचे वाटते, त्यांना गणनेदरम्यान विवाहित मानले जाईल. स्व-गणनेच्या (self-enumeration) पोर्टलवरील ‘वारंवार विचारले जाणारे प्रश्न’ (FAQs) मध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकृत माहितीनुसार, जर एखाद्या जोडप्याने आपले नाते स्थिर असल्याचे मानले, तर त्यांची नोंद विवाहित जोडपे म्हणून केली जावी. मग ती नोंद स्वतः ऑनलाइन केली असो किंवा गणनेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याद्वारे (enumerator) केली असो.
घरयादी टप्पा आणि वेळापत्रक
कुटुंबातील विवाहित जोडप्यांची संख्या हा घरयादी टप्प्यातील ३३ प्रश्नांपैकी एक आहे. हा टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान ४५ दिवस चालेल, ज्याच्या तारखा प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील. पहिले १५ दिवस स्व-गणनेसाठी असतील, त्यानंतर पुढील ३० दिवस कर्मचारी प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती गोळा करतील.
नागरिकांना कोणतेही दस्तऐवज (documents) देण्याची गरज नाही. माहिती त्यांच्या माहितीनुसार आणि विश्वासावर आधारित द्यायची आहे आणि कर्मचाऱ्यांनी ती जशी सांगितली आहे तशीच नोंदवणे बंधनकारक आहे.
स्व-गणना कशी कार्य करते?
स्व-गणनेची सुरुवात १ एप्रिल रोजी दिल्लीतील एनडीएमसी (NDMC) परिसरात एका समर्पित ऑनलाइन पोर्टलद्वारे होईल. ही सुविधा इंग्रजी आणि १५ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. घराचा प्रमुख किंवा कोणतीही जबाबदार व्यक्ती ‘ओटीपी’ (OTP) पडताळणीनंतर ही प्रक्रिया पूर्ण करू शकते. एकाच लॉगिनद्वारे कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरता येईल.
अचूक ठिकाण मार्क करण्याचे महत्त्व
घराचे अचूक ठिकाण चिन्हांकित करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. वापरकर्त्यांना जिल्हा निवडावा लागेल, पिन कोड टाकावा लागेल आणि त्यांच्या परिसराचा तपशील द्यावा लागेल. त्यानंतर एक ‘जिओटॅग्ड’ (geotagged) नकाशा दिसेल, ज्यावर उत्तरदात्याने नेमके आपल्या घरावर मार्कर ठेवणे आवश्यक आहे. चुकीच्या मार्किंगमुळे डेटा कर्मचाऱ्यांच्या सिस्टममध्ये दिसणार नाही.
सादर करणे आणि पडताळणी
घर आणि सोयीसुविधांची माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करता येईल. १५ दिवसांच्या कालावधीत हा फॉर्म टप्प्याटप्प्याने भरून ‘ड्राफ्ट’ म्हणून सेव्ह करण्याची सोयही आहे. एकदा फॉर्म सबमिट केल्यावर एक ‘SE ID’ तयार होईल, जो कर्मचाऱ्यांच्या भेटीदरम्यान पडताळणी आणि अंतिम अपलोडसाठी त्यांना देणे आवश्यक आहे.
हे पोर्टल केवळ भारतातूनच वापरता येईल. सर्व सबमिट केलेला डेटा encrypted करून सरकारी सर्व्हरवर सुरक्षित ठेवला जाईल. सबमिट केल्यानंतर माहितीमध्ये काही बदल करायचे असल्यास ते केवळ गणनेसाठी येणारा कर्मचारीच करू शकेल.
