पीटीआय, नवी दिल्ली

“सध्या सुरू असलेली जनगणना ही केवळ सरकारी मोहीम नसून ती सर्व नागरिकांची जबाबदारी आहे आणि त्यात प्रत्येकाचा सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. जनगणनेदरम्यान लोकांनी दिलेली सर्व माहिती सुरक्षित आणि गोपनीय राहील. नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होऊन ‘जनगणना २०२७’ यशस्वी करावी,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात केले.

राष्ट्रीय जनगणना हे केवळ सरकारी काम नाही; ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तुम्ही दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहते, जिला भक्कम डिजिटल सुरक्षा कवच आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी नमूद केले की, जनगणना ही देशात सध्या सुरू असलेली अत्यंत महत्त्वाची व जगातील सर्वात मोठी मोहीम असल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकांच्या घरी जाणारे कर्मचारी मोबाइल ॲपद्वारे सुसज्ज असतील. ते लोकांशी संवाद साधून जागीच माहितीची नोंद करतील, असे पंतप्रधान म्हणाले.

स्वयंगणना सुविधा

नागरिकांचा सहभाग सुलभ करण्यासाठी ‘स्वयं-गणना’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अधिकृत कर्मचारी घरी येण्याच्या १५ दिवस आधी नागरिक स्वतःची माहिती स्वतः भरू शकतात. त्यानंतर अर्जदाराला मोबाइल किंवा ईमेलवर एक ‘युनिक आयडी’ मिळेल. जेव्हा कर्मचारी घरी येतील, तेव्हा केवळ हा ‘आयडी’ दाखवून माहितीची पुष्टी करता येईल, ज्यामुळे वेळ वाचेल आणि प्रक्रिया सुलभ होईल. आतापर्यंत सुमारे १ कोटी २० लाख (१२ दशलक्ष) कुटुंबांच्या घरांची नोंदणी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

‘फास्ट ब्रीडर अणुभट्टी’ हा ऐतिहासिक टप्पा तमिळनाडूतील कल्पकम येथील ‘फास्ट ब्रीडर अणुभट्टी’ने यशस्वीपणे नियंत्रित साखळी प्रक्रिया (क्रिटीकॅलिटी) साध्य केली. या कामगिरीच्या माध्यमातून भारताने एक ऐतिहासिक टप्पा गाठल्याचे सांगत भारतीय अणुवैज्ञानिकांनी देशाची मान अभिमानाने उंचावली आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

तमिळनाडूतील कल्पकम येथील फास्ट ब्रीडर ‘अणुभट्टी’ने नियंत्रित साखळ प्रक्रिया गाठली आहे. भारतीय शास्त्रज्ञ नागरी अणू कार्यक्रमाला पुढे नेत असून त्यांचे प्रयत्न राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान