पीटीआय, नवी दिल्ली : जनगणना ही राष्ट्रीय जबाबदारी असून, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात केले. आतापर्यंत २.६ कोटींहून अधिक लोकांनी ऑनलाइन जनगणना पोर्टलवर माहिती भरली आहे. संपूर्ण देशात ३२ कोटींहून अधिक कुटुंबांची माहिती नोंदवण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

देशभरात जनगणनेचा पहिला टप्पा सुरू असून ३२ कोटींहून अधिक कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तसेच लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंड यांसारख्या दुर्गम व बर्फाच्छादित भागांतही हे काम वेगाने सुरू आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या पोर्टलद्वारे आतापर्यंत २.६ कोटींहून अधिक लोकांनी ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली. हे पोर्टल हिंदीसह १६ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सोपी आहे. https://se.census.gov.in या संकेतस्थळावर मोबाइल नंबरद्वारे लॉगिन करून अवघ्या १५ ते २० मिनिटांत माहिती भरता येते. यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही. माहिती भरल्यानंतर मिळणारा आयडी जनगणना प्रगणकाला दाखवून पडताळणी करता येईल, असेही पंतप्रधान म्हणाले.