व्हॉट्सॲपने आता ‘युझरनेम’ हे नवीन अपडेट वापरकर्त्यांसाठी आणलं आहे. एखाद्या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी तुमचा थेट फोन नंबर देण्याची गरज भासणार नाही. मात्र, फोन नंबरऐवजी ‘युजरनेम’ वापरून एकमेकांशी संपर्क साधण्याचे व्हॉट्सॲपचे हे नवे फीचर लवकरच गुंडाळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या फीचरमुळे बनावट खाती आणि ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढू शकतात, अशी भीती केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.
त्यामुळे आयटी मंत्रालयाने मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सॲपला हे फीचर सध्या लागू न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर या ‘युझरनेम’ फिचरबाबत ६ जुलैपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला दिले होते. आता केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला काहीसा दिलासा देत ‘युझरनेम’च्या या मुद्यावर उत्तर देण्यासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या संदर्भातील हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सॲपने एक युझरनेम फीचर सादर केलं. यामध्ये वापरकर्त्यांना जर त्यांचा फोन नंबर लपवायचा असेल तर त्यांच्या खात्यासाठी एक युनिक युजरनेम तयार करण्याचा हा फीचर असणार आहे. ज्यामुळे एखाद्या नव्या व्यक्तीशी संपर्क साधताना मोबाईल क्रमांक देण्याची गरज भासणार नाही. समोरची व्यक्ती केवळ युजरनेमच्या आधारे मेसेज किंवा कॉल करू शकेल, असं हे फीचर असणार आहे. मात्र, यावरून ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढण्याची शंका उपस्थित करण्यात आल्यामुळे हे फिचर भारतात सादर न करण्याचे निर्देश केंद्र सरकारने ‘मेटा’ला दिले आहेत.
दरम्यान, दूरसंचार विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, व्हॉट्सॲपच्या या नवीन फिचरमुळे एखादी व्यक्ती बनावट प्रोफाईल तयार करून बनावट कॉल करू शकते किंवा त्याचा गैरवापर करू शकते. मात्र, व्हॉट्सॲपच्या मते, वापरकर्त्यांची गोपनीयता अधिक सुरक्षित करण्यासाठी हे फीचर आणलं जात आहे. तसेच तज्ज्ञांच्या मते याच फीचरचा गैरफायदा घेत फसवे लोक दुसऱ्यांच्या नावाने किंवा बनावट ओळख वापरून लोकांची दिशाभूल करू शकतात. त्यामुळे परिणामी, तोतयागिरी आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
