Central African Republic Mine Collapse: मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये सोन्याची खाण कोसळून १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अधिकारी आणि मदतकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली. झाम्बोये गावात मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली. खाणीत काम करणारे अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे.
झाम्बोये हे गाव बाबुआ शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असून कॅमेरूनच्या सीमेजवळ आहे. खाणीत भूस्खलन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाळू आणि मातीचा ढिगारा खाणीत काम करणाऱ्या मजुरांवर कोसळला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा काही लोकांवर कोसळताना दिसत आहे. या दुर्घटनेत अनेक जण मातीखाली गाडले गेले.
१०० हून अधिक मृतदेह बाहेर काढले
स्थानिक सरकारी वकिलांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. सुरुवातीच्या निवेदनात मृतांचा निश्चित आकडा देण्यात आला नव्हता. मात्र, बचावकार्यात सहभागी रेड क्रॉस स्वयंसेवक गेर्व्हिस गनागोरोह यांनी बुधवारी १०० हून अधिक मृतदेह बाहेर काढल्याचे सांगितले. स्थानिक खाण संघटनेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही हा आकडा निश्चित केल्याचे वृत्त आहे.
बाबुआ येथील दुसऱ्या सरकारी वकिलांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, खाणीत मजूर काम करत असलेल्या अनेक भूमिगत बोगद्यांचा भाग कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले.
घटनेचे वर्णन करताना खाणीत काम करणाऱ्या एका मजुराने ही दुर्घटना “भयंकर” असल्याचे म्हटले. “जमीन पूर्णपणे कोसळली आणि लोक त्याखाली गाडले गेले,” असे त्याने सांगितले.
बचावकार्य सुरू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बचाव पथके प्रयत्न करत आहेत. खाणीत मध्य आफ्रिकन रिपब्लिक आणि शेजारील कॅमेरूनचे नागरिक काम करत असल्याचे समोर आले आहे. कॅमेरूनच्या पूर्व भागातील अधिकाऱ्यांनी आपल्या देशातील किमान तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
झाम्बोये युवा परिषदेचे सदस्य बर्ट्रांड बे यांगे यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना जिवंत शोधणे चमत्कारच ठरेल, असे म्हटले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खाणीत काम करण्यासाठी आलेल्या तरुणांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे.
बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ढिगारा हटवण्यासाठी ट्रॅक्टरसह अवजड यंत्रसामग्री वापरली जात आहे. मात्र, यामुळे अद्याप जिवंत असलेल्या व्यक्तींना धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
आफ्रिकेतील छोट्या खाणींमध्ये सुरक्षेचा प्रश्न
या दुर्घटनेने आफ्रिकेतील छोट्या खाणींमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. बेरोजगारी आणि गरिबीमुळे अनेक लोक अशा खाणींमध्ये काम करण्यास भाग पडतात. मात्र, या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन कमी प्रमाणात होते. मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्या आहेत. याच वर्षी देशातील विविध खाण दुर्घटनांमध्ये किमान ४० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
