एएनआय, नवी दिल्ली

केंद्र सरकारकडून मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. विविध मंत्रालये आणि विभागांतील ४० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसेच बदल्या करण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) या निर्णयांना मंजुरी दिली.

या फेरबदलात कार्मिक, अर्थ, ग्रामीण विकास, रसायन व खत, पर्यटन, अल्पसंख्याक व्यवहार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयांसारख्या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार, पेन्शन मंत्रालयांतर्गत प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रारी विभागाच्या सचिवपदी निवेदिता शुक्ला वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पेन्शन व पेन्शनधारक कल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी चंचल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत जमीन संसाधन विभागाच्या सचिवपदी नरेंद्र भूषण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रीय पर्जन्य-अवलंबित क्षेत्र प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी चंद्रशेखर कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदी श्रीवत्स कृष्ण यांची नियुक्ती करण्यात आली. तेजवीर सिंह यांनी रसायन व पेट्रो-रसायन विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

अर्थ मंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाच्या विशेष सचिवपदी संजय लाेहिया यांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सचिवपदी रोहित कंसल यांची नियुक्ती करण्यात आली. यांसह विविध विभागांतही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.