केंद्र सरकारने बजेट म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत लोकांच्या सूचना मागवल्या आहेत. मागील वर्षीही अशा प्रकारच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्या सूचनांचा विचार अर्थसंकल्पातल्या तरतुदींसाठी केला जातो. याच विचारातून या वर्षीही केंद्र सरकारने लोकांनी सूचना कराव्यात असे आवाहन केले. या सूचनेच्या ट्विटला काँग्रेसने भन्नाट पद्धतीने उत्तर दिले आहे. ” आमचा सल्ला हा आहे की किमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पुढच्या अर्थसंकल्पासंदर्भातल्या बैठकीला बोलवा. #FindingNirmala हा हॅशटॅगही काँग्रेसने ट्रेंड केला आहे.

डिसेंबर महिन्यात कांद्याच्या दराने शंभरी पार केली होती. या वाढलेल्या दरांनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आम्ही जास्त कांदे खात नाही असं उत्तर निर्मला सीतारामन यांनी दिलं होतं. त्यानतंर त्यांच्यावर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी चांगलीच टीका केली होती. त्यानंतर त्यांनीही एक पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर निशाणा साधला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या चर्चेत नाहीत. आता केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने लोकांकडून काही सूचना मागवल्या आहेत. जेणेकरुन या सूचनांवर विचार करुन त्यातल्या काही तरतुदी अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात येऊ शकतात.

मात्र केंद्र सरकारने मागवलेल्या सूचनांना काँग्रेसने भन्नाट रिप्लाय केला आहे. अर्थसंकल्पांबाबतच्या पुढच्या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बोलवा हाच आमचा सल्ला आहे असं खोचक उत्तर काँग्रेसने दिलं आहे. आता या टीकेवर निर्मला सीतारामन काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.