Central government : केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विमान प्रवास करताना पसंतीच्या आसन निवडीसाठी आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्र सरकारने विमानातील आसन निवडीच्या शुल्कावर आता मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे.
विमानांमधील आसन निवडीच्या शुल्कावर यापुढे मर्यादा घालण्यात आली असून सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या विमानातील ६० टक्के आसन निवड ही विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हणजे ६० टक्के आसन निवडीसाठी आता जास्तीचे पैसे द्यावे लागणार नाहीत. विमान कंपन्यांच्या अतिरिक्त शुल्काला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने बुधवारी हा निर्णय घेतला असून विमान कंपन्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रवाशांचा विमान प्रवास अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
६० टक्के जागा फ्री निवडीसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयामार्फत विमान कंपन्यांना आता असा आदेश देण्यात आला आहे की कोणत्याही विमानातील एकूण जागांपैकी किमान ६० टक्के जागा फ्री निवडीसाठी ठेवल्या पाहिजेत. आतापर्यंत अनेक विमान कंपन्या पसंतीच्या आसन निवडीसाठी अतिरिक्त शुल्क आकारत असत. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त पैसे द्यावे लागत होते. पण आता या नवीन नियमांमुळे प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता आपल्या पसंतीची जागा निवडण्याची संधी मिळणार आहे.
एकाच पीएनआर असलेल्यांना एकत्र बसवलं जाणार
आता नव्या नियमांनुसार, एकाच पीएनआरवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकत्र बसवण्याची जबाबदारी एअरलाइन्सची असणार आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आता जवळच्या जागा दिल्या जातील. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक चांगला होईल. या बरोबरच नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयामार्फत विमान कंपन्यांना आणखी काही महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
