Gas Cylinder New Rules : आखाती राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा काही ठिकाणी केला जात आहे. मात्र, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचा दावा केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून केला जात आहे. मात्र, LPG गॅस सिलिंडर साठी काही शहरांत नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे.

देशातील सर्वच राज्यात व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्याला पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला आहे. तसेच एलपीजी गॅसची टंचाई होऊ नये म्हणून केंद्र सरकारने आता महत्वाचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. ज्या ग्राहकांकडे पीएनजी कनेक्शन (पाईप गॅस) असतील त्यांना LPG गॅस सिलिंडर देण्यास परवानगी दिली जाणार नाही.

दरम्यान, आज पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जाहीर केलं आहे की पाईपद्वारे गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना एलपीजी सिलिंडर रिफिल देण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे आता अशा ग्राहकांना घरगुती एलपीजी कनेक्शन परत करावं लागू शकतं. या संदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे.

केंद्र सरकारने म्हटलं की, “पाईपद्वारे गॅस कनेक्शन असलेल्या आणि घरगुती एलपीजी कनेक्शन असलेल्या कोणत्याही व्यक्तीने घरगुती एलपीजी कनेक्शन ठेवू नये किंवा कोणत्याही सरकारी तेल कंपनीकडून किंवा त्यांच्या वितरकांकडून घरगुती एलपीजी सिलिंडरचं रिफिल घेऊ नये. तसेच अशा व्यक्तींना त्यांचं घरगुती एलपीजी कनेक्शन परत करावं लागेल.”

भारतात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा

पश्चिम आशियातील तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने पुन्हा एकदा सांगितलं की भारतात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा आहे आणि देशभरातील रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.

सोशल मीडियावर नजर

गॅस व इंधन पुरवठ्याच्या समस्यांशी संबंधित सोशल मीडियावरील पोस्ट, व्हिडीओ आणि मेसेजवर लक्ष ठेवण्याचे आदेश गुप्तचर विभागाला देण्यात आले आहेत. अफवा पसरविण्याचा किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. एलपीजी एजन्सी, पेट्रोल पम्प आणि इतर पुरवठा केंद्राबाहेरील गर्दी नियंत्रणात आणून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार किंवा साठवणूक तसेच इतर इंधनाचा काळाबाजार होत असेल तर त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.