केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. यानुसार ३१ मार्चपर्यंत खाद्यतेलाच्या साठेबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांवर निर्बंध लादण्यात आलेत. त्यामुळे ३१ मार्च २०२२ पर्यंत व्यापाऱ्यांना ठराविक मर्यादेपलिकडे खाद्यतेलाची आणि तेलबियांची साठवणूक करता येणार नाहीये. यामुळे आयात आणि निर्यातीवरही परिणाम होणार आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना खाद्यतेल काही प्रमाणात का होईना स्वस्त होईल, अशी आशा व्यक्त केली जातेय. प्रत्यक्षात काय होतं हे आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

मागील एका वर्षात खाद्य तेलाच्या किमतीत जवळपास ४६.१५ टक्क्यांनी वाढ झालीय. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसून स्वयंपाक घरातील आर्थिक गणित बिघडताना दिसत आहे. ही दरवाढ आंतरराष्ट्रीय घटक आणि स्थानिक पुरवठ्यातील तूट यामुळे झाल्याचं सरकारने म्हटलं आहे. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितलं, “सरकारच्या निर्णयामुळे आता घरेलु बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी होतील. त्यामुळे देशभरातील ग्राहकांना दिलासा मिळले.”

खाद्यतेलाच्या आणि तेलबियांच्या साठवणुकीवर निर्बंध

केंद्र सरकारने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देखील खाद्यतेलाच्या आणि तेलबियांच्या साठवणुकीवर निर्बंध लादण्याचे निर्देश दिलेत. यासाठी संबंधित राज्यांचा खाद्यतेल वापराचा आणि उपलब्ध साठ्याचा विचार करुन निर्बंध लादण्याचं सुचवण्यात आलंय. असं असलं तरी काही आयातदार आणि निर्यातदारांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आलीय. यात रिफायनरी, मिलचे निर्यातदार आणि आयातदार, होलसेलर, रिटेलर आणि डिलर यांचा समावेश आहे.

सर्व आकडेवारी केंद्र सरकारच्या वेबसाईटवर अपडेट होणार

मर्यादेपेक्षा जास्त साठा केल्यास याची माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या वेबसाईटवर घोषित करण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकारने याबाबतची सर्व आकडेवारी केंद्र सरकारच्या वेबसाईटवर अपडेट होईल याकडे लक्ष देण्याच्याही सूचना करण्यात आल्यात. सरकारने खाद्य तेलाच्या किंमतीवर नियंत्रणासाठी ८ ऑक्टोबरपासून मोहरीच्या तेलाच्या व्यापारावरही निर्बंध घातलेत.

सोयाबीन तेलाच्या किमतीत किती वाढ?

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सोयाबीन तेलाची किंमत १ वर्षापूर्वी १०६ रुपये प्रतिकिलो होती. हेच दर ९ ऑक्टोबर रोजी १५४.९५ रुपये प्रतिकिलो इतके झालेत. एका वर्षात सोयाबीन तेलाच्या किमतीत 46.15 टक्के वाढ झालीय.

मोहरी आणि वनस्पती तेलाच्या किमती किती वाढ?

मोहरीच्या तेलाच्या किमतीतही ४३ टक्क्यांनी वाढ झालीय. मोहरीच्या तेलाचे दर १२९.१९ वरुन १८४.४३ रुपये प्रतिकिलोपर्यंत गेलेत. वनस्पती तेलाच्या किमतीतही ४३ टक्क्यांनी वाढ झालीय. त्याचे दर ९५.५ रुपयांवरुन १३६.७४ रुपये प्रतिकिलो झालेत.

हेही वाचा : शेतमालाची ‘महागाई’ नाहीच!

सूर्यफूल आणि पाल्म तेलाच्या किमतीत किती वाढ?

सूर्यफूल तेलाच्या किमतीत ३८.४८ टक्के वाढ झालीय. मागील वर्षी १२२.८२ रुपये प्रतिकिलो असलेले सूर्यफूल तेल यंदा १७०.०९ रुपये इतके झालेय. पाल्म ऑईलच्या किमतीतही ३८ टक्क्यांची वाढ झाली. पाल्म ऑईलचे दर ९५.६८ वरुन १३२.०६ रुपये प्रतिकिलो झाले आहेत.