नवी दिल्ली : केंद्र सरकारने गव्हावरील निर्यातबंदी शिथिल केली असून १३ मेपर्यंत निर्यातीसाठी नोंदणी केलेला साठा पाठविण्यास मुभा दिली आहे. भारताने गव्हावर निर्यातबंदी जाहीर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे भाव वाढले आहेत. सोमवारी ते दिवसारंभी प्रतिबुशल (६० पौंड किंवा २७.२१ किलो) सहा टक्क्यांनी वधारले होते.

केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या गव्हाचा समावेश निर्यातीसाठी प्रतिबंधित श्रेणीत केला होता. यात उच्च प्रथिनयुक्त गव्हापासून ते ब्रेडसाठीच्या सर्वसाधारण प्रकारांचा समावेश होता. निर्यातबंदीचा हा आदेश शिथिल करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली.

याबाबत वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १३ मे रोजी किंवा त्यापूर्वी गव्हाचा जो साठा सीमाशुक्ल विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, आणि त्या यंत्रणेकडे त्याची नोंद झाली आहे, तो साठा देशाबाहेर पाठविता येईल, असा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे इजिप्तच्या मार्गावर असलेला साठा पुढे पाठविण्यासही मुभा दिली आहे. हा गहू कांडला बंदरात जहाजावर चढविण्याचे काम सुरू होते. इजिप्त सरकारच्या विनंतीनुसार हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मे. मेरा इंटरनॅशनल इंडिया प्रा. लि. कडून हा गहू पाठविला जात आहे. ही कंपनी ६१ हजार ५०० मे. टन गहू देशाबाहेर पाठवित असून त्यापैकी ४४ हजार ३४० टन माल आधीच जहाजावर चढविण्यात आला होता. हा संपूर्ण साठा इजिप्तला पाठविण्यास आता परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने शनिवारी गव्हाचा साठा  देशाबाहेर नेण्यास बंदी आणली होती.

यात ज्या देशांना त्यांच्या अन्नसुरक्षेसाठी गहू निर्यात करण्यास भारताने परवानगी दिली होती त्यांचा तसेच गहू निर्यातीच्या कंत्राटात जेथे रद्द न करता येण्यासारखी पतपत्रे जारी झाली होती, त्याचा अपवाद करण्यात आला होता.