दिल्लीच्या सीमारेषांवर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांविरोधात हे शेतकीर आंदोलन करत आहेत. मात्र, २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्ली शहरात प्रवेश केला. यादरम्यान, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यावेळी शेतकऱ्यांवर दिल्ली पोलिसांनी राजद्रोह आणि यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, शेतकऱ्यांवर या दोन्ही कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केलेले नसल्याचं आज केंद्र सरकारने स्पष्ट केलं. राज्यसभेमध्ये केंद्र सरकारकडून ही माहिती आज देण्यात आली आहे.

राज्यसभेत गृह राज्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विविध विषयांवर चर्चा सुरू असताना दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारला. आंदोलक शेतकरी किंवा २६ जानेवारीच्या आंदोलनामध्ये आरोपी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांवर राजद्रोह, यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचं समोर आलं होतं. मात्र, त्यांच्यावर या दोन्ही कायद्यांतर्गत एकही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती सरकारकडून राज्यसभेत देण्यात आली.

शेतकरी आंदोलकांना संताप अनावर; रागाच्या भरात फाडले भाजपा नेत्याचे कपडे!

१८३ आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे

भाकपाचे खासदार विनय विस्वम यांनी यासंदर्भात राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात गृह खात्याचे राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे. “जुलै २०२१ पर्यंत दिल्ली पोलिसांनी १८३ आंदोलक शेतकऱ्यांना अटक केली आहे. ते सर्व सध्या जामिनावर बाहेर आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये राजद्रोह, यूएपीए किंवा इतर कोणत्याही दहशतवाद विरोधी कायद्याची कलमं लावण्यात आलेली नाहीत”, असं नित्यानंद दास यांनी या उत्तरामध्ये म्हटलं आहे.

२६ जानेवारीच्या आंदोलनाला हिंसक वळण

२६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीमध्ये हजारो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीच्या निमित्ताने दिल्ली शहरात आले होते. मात्र, यावेळी पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागलं. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये देखील घडलेल्या अनुचित घटनांमध्ये दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केले आहत. यामध्ये दिल्ली पोलिसांनी एकूण ३ हजार २२४ पानांची चार्जशीट दाखल केली असून त्यात एकूण १६ जणांचा समावेश आहे. यामध्ये अभिनेता दीप सिद्धू याला मुख्य सूत्रधार मानण्यात आलं आहे.