परदेशी प्रवाशांवर लक्ष ; चाचण्या वाढविण्याचे केंद्राचे निर्देश; आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीचा फेरविचार

जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन’ संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्रासह विविध राज्यांनी प्रतिबंधात्मक पावले उचलली.

नवी दिल्ली : आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी परदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना दिले. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीबाबत फेरविचार करण्यात येत असल्याचेही केंद्राने रविवारी स्पष्ट केले.जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन’ विषाणूच्या संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सतर्क केले. ‘ओमिक्रॉन’च्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी करोना चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या, प्रवाशांची इतिहासनोंद, करोना नियमावलीचे कठोर पालन, अशी चारस्तरीय उपाययोजना लागू करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन’ संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्रासह विविध राज्यांनी प्रतिबंधात्मक पावले उचलली.

प्रत्येक राज्याने आपल्या स्तरावर आढावा घ्यावा आणि ‘जोखमी’च्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या कराव्यात. बाधित प्रवाशांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीसाठी त्वरित पाठवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याची खात्री राज्यांनी करावी, अशा सूचनाही केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्या.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर काटेकोर लक्ष ठेवण्याची गरज भूषण यांनी अधोरेखित केली. ते म्हणाले, ‘‘परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाचा तपशील मिळविण्यासाठीची यंत्रणा आपल्याकडे तयार आहे. तिचा वापर करण्यात यावा.’’ परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या सक्तीने करोना चाचण्या, बाधितांच्या  जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या आणि त्यांच्या प्रवास इतिहासाची सविस्तर नोंद ठेवण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले.

मोठय़ा प्रमाणावर करोनाबाधित आढळलेल्या ठिकाणांवर (हॉट स्पॉट) सतत लक्ष ठेवावे, करोना प्रतिबंधासाठी हॉट स्पॉट निश्चित करावेत, सर्वसामान्यांच्या चाचण्यांची संख्या वाढवावी, बाधितांचे नमुने त्वरित जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीसाठी पाठवावेत, अशा सूचनाही केंद्रीय आरोग्य सचिवांनी केल्या आहेत.   

राज्यांनी लसीकरणाची व्यापकता वाढवावी आणि करोना नियमावलीची कठोर अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

विमान वाहतुकीबाबतच्या निर्णयाचा फेरविचार

नवी दिल्ली : ‘ओमिक्रॉन’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी रविवारी तातडीची बैठक घेतली. तीत १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्याबाबत फेरविचाराचा निर्णय घेण्यात आला. 

शाळांबाबत आज निर्णय?  करोना रुग्णआलेख घसरल्याने राज्यभरात सर्व शाळा (पहिलीपासून) १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, ‘ओमिक्रॉन’च्या धास्तीने या निर्णयाबाबत फेरविचार करण्यात येत आहे. शाळांबाबत आज, सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

वृद्धाश्रमातील ६७ जणांना करोना

कल्याण : कल्याण तालुक्यातील खडवली येथील भातसा नदीकाठच्या मातोश्री वृद्धाश्रमातील ६७ वृद्धांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील काही वृध्दांना तापसदृश्य लक्षणे आहेत. या सर्व वृद्धांना ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पडघा आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्याने दिली.

दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी करोनाबाधित

डोंबिवली : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून गेल्या बुधवारी डोंबिवलीत आलेल्या एका रहिवाशाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

लशींचे क्षमता मूल्यांकन आवश्यक: एम्सप्रमुख

नवी दिल्ली : करोनाचा ‘ओमिक्रॉन’ हा उत्परिवर्तित विषाणू प्रथिन संरचनेत मोठय़ा संख्येने बदल घडवत असल्याची माहिती पुढे आल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी करोना लशीच्या क्षमतेचे गांभीर्याने मूल्यांकन करण्याची गरज आहे, असे मत ‘एम्स’ रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदिप गुलेरिया यांनी व्यक्त केले. 

केंद्राचे निर्देश काय?

* परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या आवश्यक.

* सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन चाचण्यांमध्येही लक्षणीयरीत्या वाढ करावी.

* सर्व बाधितांचे नमुने ताबडतोब जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीसाठी पाठवावेत.

* मोठय़ा प्रमाणावर बाधित आढळलेल्या ठिकाणांवर  सतत लक्ष ठेवावे.

* राज्यांनी लसीकरणाची व्यापकता वाढवून करोना नियमावलीची कठोर अंमलबजावणी करावी.   

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Central government step over new omicron variant zws

ताज्या बातम्या