तत्कालीन लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांच्या जन्मतारखेच्या मुद्दय़ावरून केंद्र सरकार व त्यांच्या बेबनाव निर्माण झाला होता. सिंग यांना मुदतवाढ देण्यास सरकारचा नकार होता. तर सिंग यांनी वयाचा मुद्दा पुढे करत मुदतवाढीस आपण योग्य असल्याचा दावा केला होता. त्यांच्या जन्मतारखेचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. त्याविषयीची सुनावणा १६ जानेवारी २०१२ रोजी होणार होती. नेमक्या त्याच रात्री लष्कराच्या दोन तुकडय़ांनी हालचाली केल्या. त्यामुळे या सर्व प्रकारामागे सिंग यांचाच हात असल्याचा संशय केंद्र सरकारच्या मनात निर्माण झाला होता.
माजी डीजीएमओ ए. के. चौधरी यांनी मात्र लष्कराचा असा कोणताही इरादा नव्हता असे स्पष्ट केले आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील वृत्तानुसार १५ व १६ जानेवारी २०१२ रोजी चंडिगढ व हिसार येथून लष्कराच्या दोन तुकडय़ा दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. या तुकडय़ा दिल्लीवर चाल करून येत असल्याची खबर गुप्तचर विभागाने सरकारला दिली. त्यामुळे सरकारी पातळीवर प्रचंड घबराट उडाली. त्यानंतर १५ जानेवारीच्या रात्री साडेअकरा वाजता तत्कालीन संरक्षण सचिव शशिकांत शर्मा यांनी तातडीने चौधरी यांना पाचारण करत झाल्या प्रकाराबद्दल जाब विचारला. तसेच दोन्ही तुकडय़ांना आपापल्या तळावर परत जाण्याचे निर्देश देण्यास सांगितले. चौधरी यांनी दुसऱ्या दिवशी या सर्व प्रकाराचा अहवाल केंद्राकडे सादर करताना दोन्ही तुकडय़ा सराव व प्रशिक्षणाचा भाग म्हणून दिल्लीकडे येत होत्या व हे सर्व पूर्वनियोजित होते असे स्पष्ट केले. हा सर्व घोळ लष्करी नेतृत्व व सरकारी नेतृत्व यांच्यातील अविश्वासामुळे झाल्याचेही चौधरी म्हणाले.
व्ही. के. सिंग यांचा आरोप
दरम्यान, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी हा सर्व प्रकार चंडिगढच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. आपल्याला बदनाम करण्यासाठीच हा सर्व बनाव रचण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
चौकशीच करा
लष्कराविषयी सरकारच्या मनात अविश्वास निर्माण होणे हा एक प्रकारे लष्कराचा मानभंगच आहे. तसेच सरकारकडून त्या वेळी करण्यात आलेले आरोपही गंभीर स्वरूपाचे होते. या सर्व पाश्र्वभूमीवर संपूर्ण प्रकाराची योग्य ती चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी केली आहे.