scorecardresearch

“केंद्र सरकार लष्कराच्या मागे लपत…”, चिनी घुसखोरीवरून राहुल गांधींचं टीकास्त्र; म्हणाले…

“माझे वडील, आजी दोघेही शहीद झाले आहेत, हे दु:ख…”, असेही राहुल गांधींनी सांगितलं.

“केंद्र सरकार लष्कराच्या मागे लपत…”, चिनी घुसखोरीवरून राहुल गांधींचं टीकास्त्र; म्हणाले…
राहुल गांधी ( एक्स्प्रेस छायाचित्र – गजेंद्र यादव )

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्यील यांगत्से सीमाभागात चिनी सैनिक आणि भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये ९ डिसेंबरला झटापट झाली होती. यामध्ये दोन्ही देशांचे सैनिक जखमीही झाले होते. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. केंद्र सरकारचं चीन धोरण पूर्णपणे चुकलं आहे. सरकारकडून लष्कराच्या मागे लपून स्वत:च्या बचावाचा प्रयत्न होत आहे. पण, सीमेवर काय घडलं ते सर्वांना सांगा, असे आव्हान राहुल गांधींनी केंद्र सरकारला दिलं आहे.

राहुल गांधींनी ३१ डिसेंबरला प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा राहुल गांधींनी चिनी घुसखोरी, ‘भारत जोडो यात्रा’ आणि अन्य प्रश्नांवर भाष्य केलं. राहुल गांधी म्हणाले, “माझे वडील, आजी दोघेही शहीद झाले आहेत. हे दु:ख भाजपाला समजणार नाही. कारण, त्यांच्या कुटुंबातील कोणाचीही हत्या झालेली नाही. सीमेवर देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या प्रत्येक भारतीय जवानावर मी प्रेम करतो. त्यांच्यापैकी एकही जवान शहीद होऊ नये, असं मला वाटतं.”

हेही वाचा : “कर्नाटकामध्ये भाजपा स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार”, अमित शहांची मोठी घोषणा; म्हणाले, “काही लोकं जाणीवपूर्वक…”

“मी सरकारबद्दल काही भाष्य केलं, तर लष्कराविरोधात बोललो असल्याचं सांगत दिशाभूल करण्यात येते. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या पाठिशी आहेत. पण, चिनी घुसखोरी केल्याचं मान्य करत, चुकांची कबुली दिली पाहिजे. घुसखोरी झाली नसल्याचा दावा केल्याने चीनचं फावलं आहे,” असं सांगतं “चीन आणि पाकिस्तान आपल्याविरोधात एकत्र येत आहे,” असा दावाही राहुल गांधींनी केला आहे.

हेही वाचा : चीनने करोनाविषयक माहिती द्यावी; जागतिक आरोग्य संघटनेचे आवाहन

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा पंजाब आणि काश्मीर सारख्या संवेदनशील भागातून जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचं सांगत काँग्रेसने गृहमंत्रालयाला पत्र लिहलं होतं. त्यावर सीआरपीएफकडून सांगितलं गेलं की, राहुल गांधींनी २०२० पासून ११३ वेळ सुरक्षा कवचाचं उल्लंघन केलं आहे. यावरही राहुल गांधींनी भाष्य केलं. “भारत जोडो ही पदयात्रा आहे. ती बुलेटप्रुफ कारमध्ये बसून कशी केली जाणार. मात्र, केंद्र सरकारकडून माझ्याविरुद्ध मुद्दा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाचे नेते रोड शो करतात तेव्हा नियम आडवे येत नाही,” असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 10:26 IST

संबंधित बातम्या