scorecardresearch

“जम्मूवर अन्याय होण्याचे दिवस संपले, आता कुणीही…”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली भूमिका!

केंद्रीय मंत्री अमित शाह सध्या तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. कलम ३७० हटवल्यापासून हा त्यांचा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे.

“जम्मूवर अन्याय होण्याचे दिवस संपले, आता कुणीही…”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली भूमिका!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (फोटो सौजन्य – पीटीआय)

देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह सध्या तीन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज त्यांच्या हस्ते काश्मीरमधील आयआयटी संस्थेच्या कॅम्पसचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भागवती नगरच्या सभेमध्ये बोलताना अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरवासीयांना प्रगती साध्य करून देण्याचा शब्द दिला. तसेच, जम्मू-काश्मीरवर आत्तापर्यंत राज्य केलेल्या तीन कुटुंबांनी काय केलं काश्मीरसाठी? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच अमित शाह जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले आहेत.

“सरकारने सर्वांसोबत न्याय केला”

“जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचं नवं युग अवतरलं आहे. जम्मूविषयी आधी अन्याय आणि भेदभाव होत असल्याचं चित्र होतं. पण आता जम्मू, काश्मीर आणि लडाख यांचा समान विकास होण्यासाठी प्रशासन बांधील आहे”, असं त्यांनी नमूद केलं. “सरकारने सर्वांसोबत न्याय केला आहे. यामध्ये वाल्मिकी, पहाडी, गुज्जर, बाकेरवाल, पश्चिम पाकिस्तानचे निर्वासित आणि महिला अशा सर्वांचाच समावेश आहे”, असं देखील अमित शाह म्हणाले.

“जम्मू-काश्मीरचा विकास रोखण्याचा काहींचा प्रयत्न”

दरम्यान, जम्मू-काश्मीरचा विकास रोखण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. “काहींनी राज्याचा विकास रोखण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने असं काही होणार नाही याची काळजी घेतली. अनेक प्रकारचे कायदे करण्यात आले. त्यामध्ये वनअधिकार कायद्याचा देखील समावेश आहे”, असं ते यावेळी म्हणाले. “ही मंदिरांची, माता वैष्णो देवीची, प्रेम नाथ डोग्रा यांची, श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाची भूमी आहे. आम्ही कुणालाही राज्याच्या विकासाच्या प्रवासाच्या आड येऊ देणार नाही”, असं देखील प्रतिपादन अमित शाह यांनी यावेळी केलं.

तीन कुटुंबांनी जम्मू-काश्मीरचं नुकसान केलं

यावेळी बोलताना अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरचं तीन कुटुंबांनी मिळून नुकसान केल्याची टीका केली. “ज्या तीन कुटुंबांनी जम्मू-काश्मीरचं नुकसान केलं, तेच आमच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मी त्यांना विचारू इच्छितो की तुम्ही इतका दीर्घ काळ इथे राज्य केलं, काय केलं तुम्ही इतक्या वर्षांत? जम्मू-काश्मीरचे लोक तुम्हाला विचारत आहेत, की इतक्या वर्षांत तुम्ही त्यांच्यासाठी काय केलंय?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 17:45 IST

संबंधित बातम्या