देशामध्ये करोनाच्या एकूण रुग्णसंख्येत आणि मृतांच्या आकड्यांमध्ये घट झालेली असताना काही राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रात देखील टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, असं असताना अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून अनलॉकसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. “काही राज्यांमध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर मोठ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे अनलॉक करताना किंवा निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकारांनी काळजी घेण्याची गरज आहे”, असं या पत्रामध्ये गृह सचिवांनी नमूद केलं आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आणि पॉझिटिव्हिटीवर लक्ष ठेवा!

या पत्रामध्ये अजय भल्ला यांनी राज्य सरकारांना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आणि पॉझिटिव्हिटी रेटवर लक्ष ठेवण्याचं आवाहव केलं आहे. “करोनाचा प्रादुर्भाव दीर्घकाळ कमी करण्यासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रीट अर्थात चाचणी, शोध आणि उपचार या पद्धतीचा वापर करणं आवश्यक आहे. विशेषत: चाचण्यांचं प्रमाण कमी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यासोबतच ज्या ठिकाणी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागेल, तिथे लागलीच स्थानिक पातळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील”, असं या पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

गर्दी वाढली, काळजी घ्या

दरम्यान, या पत्रामध्ये राज्य सरकारांना वाढत्या गर्दीबाबत देखील इशारा देण्यात आला आहे. “काही राज्यांमध्ये निर्बंध शिथिल करताच बाजारपेठांसारख्या ठिकाणी गर्दी वाढल्याचं चित्र दिसू लागलं आहे. अशा ठिकाणी करोनाविषयीचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे गुंतागुंत वाढू नये आणि अशा प्रकारे नियम मोडण्याचे प्रकारांकडे दुर्लक्ष होऊ नये, याकडे अनलॉक करताना काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे”, असं या पत्रात नमूद केलं आहे. यासाठी मास्क वापराची सक्ती, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग आणि बंद ठिकाणी पुरेसं हवेशीर वातावरण या बाबी आवश्यक आहेत”, असं देखील राज्य सरकारांना सांगण्यात आलं आहे.

Covid 19: तिसरी लाट टाळता येणं अशक्य, पुढील सहा ते आठ आठवड्यात…; एम्सच्या प्रमुखांचं मोठं विधान

लसीकरणाचा वेग वाढवा

याशिवाय, केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याचं देखील आवाहन केलं आहे. “सध्याच्या परिस्थितीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना त्याची साखळी तोडण्यासाठी लसीकरण फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त लोकसंख्या लसीकृत करण्यासाठी प्रयत्न करावेत”, असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.