देशात अनेक ठिकाणी एव्हियन इन्फ्लूएन्झा (H5N1) विषाणूने बाधित झालेले रुग्ण आढळल्यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी (३१ मे) सर्व राज्य सरकारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. एव्हियन इन्फ्लूएन्झाला बर्ड फ्लू देखील म्हटलं जातं. “कुठेही पक्षी आणि कोंबड्यांचा असामान्य मृत्यू झाल्यास त्या प्रकरणी लक्ष घाला, सावध राहा आणि यासंबंधीची माहिती ताबडतोब पशुसंवर्धन विभागाला कळवा”, असं केंद्र सरकारने राज्य सरकारांना पाठवलेल्या आदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच त्यांना सांगितलं आहे की, तुमच्या राज्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना, खासगी रुग्णालयांना एव्हियन इन्फ्लूएन्झाची चिन्हे आणि लक्षणांची माहिती द्या. त्याचबरोबर सर्व पोल्ट्री फार्मची तपासणी करा. स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दिलेले सर्व नियम तिथे पाळले जात आहेत की नाही याची तपासणी करा.

पोल्ट्री फार्म आणि इतर पक्ष्यांमधील संपर्क टाळण्यासाठी उपाययोजना राबवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तसेच एव्हियन इन्फ्लूएन्झापासून बचावासाठी संरक्षणात्मक उपायांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश केंद्र सरकारडून देण्यात आले आहेत. केंद्राने राज्यांना अँटीव्हायरल औषधे, पीपीई किट, मास्क आणि इतर प्रतिबंधात्मक वस्तूंसह सुसज्ज राहण्याचा सल्ला दिला आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय विभागाने २५ मे रोजी जारी केलेल्या संयुक्त निर्देशांत म्हटलं आहे की, आंध्र प्रदेश (नेल्लोर), महाराष्ट्र (नागपूर), केरळ (अलापुप्झा, कोट्टायम आणि पथनामथिट्टा जिल्हे) आणि झारखंडच्या रांचीमधील पोल्ट्रीमध्ये एव्हियन इन्फ्लूएन्झाची प्रकरणं आढळली आहेत.

यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयात नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील मृत कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आजाराला कारणीभूत असणारा एच ५ एन १ हा विषाणू आढळला होता. तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याच बर्ड फ्लूचा धोका जगभरातील तज्ज्ञांनी अधोरेखित केला आहे. यूके-आधारित टॅब्लॉइड डेली मेलच्या अहवालानुसार, “कोविड १९ च्या साथीच्या आजारापेक्षा १०० पट वाईट परिस्थिती निर्माण करण्याची आणि मृत्यू दर वाढवण्याची ताकद बर्ड फ्लूमध्ये असू शकते.”

हे ही वाचा >> World No Tobacco Day 2024: धूम्रपानाचा गर्भवती महिलांवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या…

तज्ज्ञांच्या हवाल्याने दिलेल्या या अहवालात नवीन साथीच्या आजाराच्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. संशोधकांनी बर्ड फ्लूच्या H5N1 व्हेरिएंटवर चर्चा करून हा विषाणू प्रचंड वेगाने पसरत असल्याची माहिती दिली होती. या विषाणूमध्ये करोनासारखी जागतिक महामारी निर्माण करण्याची क्षमता असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.