Chinese Apps Ban on BAT-BMS after E-Rickshaw Hacking Delhi: राजधानी दिल्लीच्या रस्त्यावर सध्या एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यावर चालणाऱ्या ई-रिक्षा अचानक बंद पडत आहेत. काही समाजकंटक मोबाइल ॲप्सच्या मदतीने ई-रिक्षा बंद करत आहेत. भररस्त्यात ई-रिक्षा बंद होत असल्यामुळे चालक तर त्रस्त झाले आहेतच. मात्र यामुळे अपघाताचीही भीती निर्माण झाली आहे. काही ई-रिक्षा बंद पडल्यामुळे चालकांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

चीनच्या ॲप्सचा वापर करून हे कृत्य होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर केंद्र सरकारने BAT-BMS, Lossigy आणि Epoch Li-ion या ॲप्सना सुरक्षेच्या कारणास्तव गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. लिथियम बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षा BAT-BMS या ॲपचा वापर करून थांबविण्यात येत होत्या.

ई-रिक्षा कशा हॅक व्हायच्या?

व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, काही तरुण ब्लूटूथद्वारे जवळच्या ई-रिक्षांना मोबाइल कनेक्ट करत होते. त्यानंतर चालत्या रिक्षांची बॅटरी चायनीज ॲपद्वारे बंद केली जायची. काही समाजकंटकांनी हा प्रँक असल्याचे म्हटले. मात्र दिल्लीच्या जहांगीरपुरी, संगम विहार, बदरपूर बॉर्डर, नई दिल्ली आणि पहाडगंज अशा परिसरात ई-रिक्षा अचानक बंद होण्याच्या घटना वाढल्या होत्या.

केंद्र सरकारने काय म्हटले?

माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव एस. कृष्णन यांनी कारवाईबाबत माहिती दिली. ते म्हणाले, काल आमच्या निदर्शनास आलेले काही ॲप्स प्ले स्टोअरवरून हटविण्यात आले आहेत. संभाव्य हानिकारक ॲप्स उपलब्ध होणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत.

बॅट-बीएमएस ॲप कसे काम करते?

बॅट-बीएमएस हे ॲप चीनच्या कंपनीने विकसित केले होते. हे ॲप ब्लूटूथवर आधारित लिथियम-आयन बॅटरीचे व्यवस्थापन करण्यासाठी या ॲपचा वापर केला जातो. ॲपच्या माध्यमातून बॅटरीची चार्जिंग स्थिती, व्होल्टेज, करंट, तापमान, चार्जिंगच्या वेळा आणि एकूणच बॅटरीचे आरोग्य याचे व्यवस्थापन केले जाते.

या ॲपच्या माध्यमातून बॅटरीचे चार्जिंग आणि डिस्चार्जिंग याचे नियमन करता येते. प्ले स्टोअरवर ॲपची माहिती देताना नमूद केले आहे की, हे ॲप १५ मीटर अंतरावरील बॅटरीला ब्लूटूथद्वारे कनेक्ट होऊ शकते. असे ॲप हे बॅटरीच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मुख्यत्वे करून सर्व्हिस सेंटरमध्ये वापरली जातात.