पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार स्थापना; काळ्या पैशाबाबत विशेष तपास पथकाकडूनही चौकशी होणार
करचोरीची आश्रयस्थाने असलेल्या ठिकाणी भारतीयांनी परदेशी कंपन्या स्थापन केल्याच्या सर्व प्रकरणांचा तपास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनुसार एक विशेष बहुसंस्था गट (मल्टि-एजन्सी ग्रूप) स्थापन करण्यात येत असल्याचे सरकारने सोमवारी जाहीर केले. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने पनामा पेपर्सबाबत सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून या प्रकरणातील नावांची पहिली यादी प्रकाशित करताच ही घडामोड घडली आहे.
‘कुठल्याही शोधपत्रकारितेच्या’ माध्यमातून बाहेर आलेली माहिती स्वागतार्ह असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) तपास पथक आणि त्याचे ‘फॉरेन टॅक्स अँड टॅक्स रिसर्च डिव्हिजन’ या दोन्हींतील अधिकाऱ्यांचा या गटात समावेश राहणार असून, आर्थिक गुप्तचर विभाग (फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट) व भारतीय रिझव्र्ह बँक प्रत्येक प्रकरणात मिळणाऱ्या माहितीवर देखरेख ठेवणार असल्याचे अर्थमंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
काळ्या पैशाची निर्मिती शोधणे व तिला आळा घालणे यासाठी सरकार बांधील आहे. या संदर्भात पनामा पेपर्स उघडकीला आल्यामुळे सरकारला हे उद्दिष्ट साध्य करण्यात मदतच होणार आहे. या तपास प्रक्रियेत मदत करण्यासाठी विदेशी सरकारांसह सर्व स्रोतांकडून जास्तीत जास्त माहिती मिळवण्याकरिता सरकार आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
जगात असे काही देश आहेत, ज्यांचा उपयोग करचोरीची आश्रयस्थाने म्हणून करण्यात येतो आणि त्यामुळे जगातील इतर देशांना करांचे नुकसान सहन करावे लागते. याबाबत भारताला चिंता आहे. बेस इरोजन अँड प्रॉफिट शिफ्टिंग (बीईपीएस)च्या ताज्या उपक्रमामुळे अशा करचोरीच्या निवाऱ्यांच्या माध्यमातून कराची चोरी करण्याच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवणे भारतासह इतर देशांना शक्य होईल. बीईपीएसच्या या उपक्रमाशी भारतही पूर्णपणे बांधील आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
‘मोझॅक फॉन्सेका’ या कायदा सल्लागार कंपनीच्या गुप्त फाइल्समधील ही ११ दशलक्ष कागदपत्रे आहेत. जगभरातील श्रीमंत लोकांना कर चुकवणे सोयीचे जावे यासाठी अक्षरश: एखाद्या कारखान्याप्रमाणे परदेशी कंपन्या तयार करण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते.

काळ्या पैशाबाबत विशेष तपास पथकातील न्यायाधीशांचा खुलासा
केंद्र सरकारने काळ्या पैशाचा तपास करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश एम. बी. शहा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन केले होते. शहा यांनी म्हटले की पनामा कागदपत्रांमध्ये नावे उघड झालेल्या ५०० भारतीयांची सखोल चौकशी केली जाईल. पथकाचे उपप्रमुख निवृत्त न्यायाधीश अरिजित पासायत यांनी सांगितले की, विशेष तपास पथकाने सक्तवसुली संचालनालय, प्राप्तिकर खाते, महसूल गुप्तवार्ता संचालनालय या संस्थांना पनामा यादीतील भारतीयांच्या व्यवहारांची माहिती गोळा करून अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दाऊद, इक्बाल मिर्चीचा कागदपत्रांत उल्लेख
भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिम याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा साथीदार इक्बाल मिर्ची यांचा तीन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला असला तरी त्याचे नाव पनामा कागदपत्रांत आढळले आहे. भारतीय तपास यंत्रणांनी मिर्चीच्या कारवायांबद्दल विस्तृत अहवाल तयार केला होता. त्यात मिर्चीने विविध देशांत मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरलेल्या बोगस कंपन्यांचा उल्लेख आहे. या व कंट्री प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून मिर्चीने सायप्रस, तुर्कस्तान, मोरोक्को, स्पेन असा देशांत मालमत्ता खरेदी केल्या. आता पनामा कागदपत्रांतील उल्लेखाने त्याला दुजोरा मिळाला आहे.

अदानींच्या बहामातील कंपनीच्या नावात दोन महिन्यांत बदल
१ अदानी उद्योगसमूहातील अदानी एक्स्पोर्ट्स लिमिटेड या कंपनीची १९९३ साली बहामा बेटांवर स्थापना करण्यात आल्यानंतर केवळ दोनच महिन्यांत उद्योगपती गौतम अदानी यांचे थोरले बंधू विनोद शांतीलाल शहा अदानी यांनी बहामात जानेवारी १९९४ मध्ये कंपनी स्थापन केली.

२विनोद अदानी समूहाचे परदेशातील व्यवहार सांभाळतात तर त्यांचा मुलगा प्रणव अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड या कंपनीचा संचालक आहे. मोझॅक फॉन्सेकाच्या नोंदींनुसार विनोद अदानी यांनी ४ जानेवारी १९९४ रोजी बहामात जीए इंटरनॅशनल इन्कॉर्पोरेशनची स्थापना केली.

३विनोद आणि त्याची पत्नी रंजनबेन तिचे संचालक होते. मोझॅक फॉन्सेकाची नोंदणीकृत एजंट म्हणून नेमणूक केली होती. मात्र दोनच महिन्यांत जीए इंटरनॅशनलची व्यवस्थापक फाल्कन मॅनेजमेंट लिमिटेडने (आइल ऑफ मॅन येथील) कंपनीच्या नावातील स्पेलिंग बदलून अदानीच्या जागी शहा असा उल्लेख करण्याची इच्छा व्यक्त केली.

भारतीय व्यक्ती ..
या संस्थेच्या यादीत पाचशे भारतीयांची नावे असून त्यात सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय व डीएलएफचे मालक के.पी. सिंग, इंडियाबुल्सचे मालक समीर गेहलोत यांचा समावेश आहे.

अमिताभ बच्चन : ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स आणि बहामातील ४ शिपिंग कंपन्यांचे संचालक होते. १९९३ साली या कंपन्या स्थापन झाल्या होत्या. त्यांचे अधिकृत भांडवल ५००० ते ५०,००० डॉलपर्यंत होते. मात्र त्यांनी लाखो डॉलरचे व्यवहार केले होते. बच्चन यांनी याबाबतच्या कोणत्याही ईमेलला वा फोनला उत्तर दिले नाही.

हरीश साळवे : परदेशी कंपनी- क्रेस्ट ब्राइट लि., प्येब्युश ग्रुप लि., एडेनव्हाल लि. हरीश साळवे हे देशातील प्रसिद्ध वकील असून ते सुप्रीम कोर्टात वकिली करतात. ते सॉलिसिटर जनरलही होते. ते व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने क्रेस्ट ब्राइट लि., प्येब्युश ग्रुप लि., एडेनव्हाल लि. या तीन कंपन्या आहेत. लंडनचे एजंट रावी अँड कंपनी यांच्या माध्यमातून त्यांनी नोंदणी केली. साळवे यांचा पत्ता वसंत विहार, नवी दिल्ली असा आहे. रमेश महाजन व आशा महाजन यांच्या नावाने ट्रस्ट व कंपनी स्थापन. साळवे क्रेस्टब्राइटचे संचालक. सालेंद्र स्वरूप हे दुसरे संचालक. पत्नी मीनाक्षी व कन्या साक्षी हे संचालक.
साळवे यांनी सांगितले की, २०१२ मध्ये क्रेस्टब्राईट कंपनी स्थापन केली. ती कायदेशीर होती व गुंतवणूक जाहीर केली होती. ब्रिटनमधील कंपनीची मालमत्ता व प्राप्ती शून्य आहे. एलआरएनुसार पैसे अमेरिका व ब्रिटनमध्ये गुंतवले. भारत व ब्रिटनचा करदाता आहे. कुठलीही मालमत्ता वळवलेली नाही. पैसै मात्र भारतीय बँकेतून ब्रिटनच्या बँकेत टाकले. ब्रिटनमध्येही मला उत्पन्न आहे. सर्व बँक खात्यांची माहिती दिली आहे. काहीच लपवलेले नाही. बीव्हीआय कंपन्यांचे मूल्य शून्य आहे. महाजन हे कॅनेडियन नागरिक आहेत. निवासस्थान हस्तांतरासाठी ते आले होते व कंपनी स्थापन करायची होती त्यामुळे त्यांना ट्रस्ट स्थापनेचे पत्र दिले.

के. पी सिंग : डीएलएफचे मालक के पी सिंग यांनी पत्नीसह ब्ििटश व्हर्जिन आयलंड्समध्ये २०१० साली एक कंपनी स्थापन केली. २०१२ साली त्यांच्या मुलाने आणि मुलीने आणखी दोन कंपन्या स्थापन केल्या. त्यांची एकूण मालमत्ता १० दशलक्ष डॉलर आहे. संबंधित कंपन्यांचा निधी हा सरकारच्या नियमानुसार आणि अधिकृत एजंटमार्फत पाठविलेला आहे, असा खुलासा के.पी. सिंग यांनी कुटुंबाच्या वतीने केला.

ऐश्वर्या राय : ऐश्वया राय, तिचे वडील आणि आई आणि भाऊ आदित्य हे २००५ साली नोंदवण्यात आलेल्या अमिक पार्टनर्स लि. या कंपनीचे संचालक होते. ती कंपनी २००८ मध्ये बरखास्त करण्यात आली. तत्पूर्वी ऐश्वर्याने संचालकपद सोडले होते आणि ती केवळ भागधारक होती. मात्र ही माहिती चुकीची आहे, असा खुलासा ऐश्वर्या रायच्या माध्यम सल्लागार अर्चना सदानंद यांनी केला.

गरवारे कुटुंब : पनामा कागदपत्रातील नोंदीनुसार गरवारे कुटुंबातील अशोक गरवारे, आदित्य गरवारे व सुषमा गरवारे यांचा परदेशी आस्थापनांशी संबंध. अशोक गरवारे हे रोंडोर ओव्हरसीज लि. या कंपनीचे भागधारक, कंपनीची नोंदणी बीव्हीआय येथे १० मे १९९६. गरवारे यांच्याकडे एक डॉलर चे १००० शेअर्स. आदित्य गरवारे व सुषमा गरवारे यांना पनामाच्या अनेक कंपन्यात भागधारक म्हणून अधिकार.

प्रतिक्रिया ..
मोझॅक फॉन्सेका कंपनीच्या संस्थापकांपैकी एक असलेले रॅमन फॉन्सेका यांनी सांगितले की, ही माहिती वृत्तपत्रांनी फोडली; हा गुन्हा असून पनामावरचा हल्लाच आहे. आम्ही स्पर्धात्मक आहोत व कंपन्यांना आकर्षित करीत आहोत, हे काहींच्या डोळ्यांत सलले असल्यामुळे त्यांनी ही कागदपत्रे खुली केली.
**********
बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक गॅब्रियल झुकमन यांनी सांगितले की, पनामा कागदपत्रातून अनेक बेकायदेशीर बाबी उघड झाल्या आहेत.
**********
पनामा सरकारने चौकशीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून मोझॅक फॉन्सेका कंपनीने ही कागदपत्रे उघड करणे म्हणजे गुन्हा आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
**********
परदेशातील संपत्तीबाबतचे आतापर्यंतचे हे सर्वात मोठे प्रकरण उघड झाले आहे, असे आयसीआयजेचे संचालक गेरार्ड राइल यांनी सांगितले.
**********
बार्सिलोनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीवरचे करचुकवेगिरी, काळा पैसा चलनात आणणे आदी आरोप तथ्यहीन आहेत, असे त्याच्या कुटुंबीयांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पनामा कागदपत्रांनी जगभरात खळबळ..
पनामा पेपर्स हे शोध पत्रकारितेतील आतापर्यंतचे सर्वात मोठे
उदाहरण ठरले असून वृत्तपत्रांच्या इतिहासात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गुप्त माहिती कधी
उघड झाली नव्हती.
* मध्य अमेरिकेतील पनामा या कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील मोझॅक फॉन्सेका या कायदा सल्लागार कंपनीची ११.५ दशलक्ष गोपनीय कागदपत्रे जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वर्तमानपत्राच्या हाती पडली.
* त्यांनी ही माहिती ‘इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स’ (आयसीआयजे) या जागतिक शोध
पत्रकारांच्या संघटनेला दिली.
* ‘आयसीआयज’ने ही कागदपत्रे जगभरच्या महत्त्वाच्या प्रसारमाध्यमांना वाटली. त्यात ब्रिटनमधील द गार्डियन, बीबीसी, अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि मायामी हेराल्ड, रशियातील वेदेमोस्ती, स्पेनमधील ‘अल कॉन्फिडेन्शियल’, फ्रान्समधील ‘ल माँद’ , ऑस्ट्रेलियातील ‘एबीसी फोर कॉर्नर्स’, कॅनडातील सीबीसी/रेडिओ, युगांडातील ‘डेली मॉनिटर’, अर्जेटिनातील ‘ला नेशन’ आणि भारतातील ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांना दिली. जगातील १०० माध्यमसमूहांनी यात एकत्रित भूमिका बजावली.
ल्ल या माध्यमांच्या स्थानिक पत्रकारांनी आपापल्या देशाशी संबंधित माहितीची छाननी करून ती संगतवार मांडून तिचा अन्वयार्थ लावला.
* ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे २५ पत्रकार गेले ८ महिने या कामी गुंतले होते.
* ही कागदपत्रे सत्तर देशातील ३७० वार्ताहरांनी तपासली असून त्याच्याआधारे एकाचवेळी काही वृत्तपत्रातून त्याचे भांडाफोड करण्यात आले. या कागदपत्रांचा स्रोत मात्र उघड होऊ शकलेला नाही.

मोझॅक फॉन्सेका कंपनीबाबत..
मोझॅक फोन्सेका या कायदेशीर सल्लागार कंपनीचे ५०० बँका व त्यांच्या उपशाखांशी १९७० पासून संबंध असून त्यांनी या बडय़ा व्यक्तींना त्यांचा काळा पैसा परदेशात लपवण्यास मदत केली आहे. बँका, कायदेशीर संस्था व परदेशातील इतर आस्थापनांनी नियम पायदळी तुडवून काळा पैसा व बेहिशेबी मालमत्ता लपवण्यास मदत केली असून हा मोठा गुन्हा आहे, कर चुकवून मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

परदेशी व्यक्तींमध्ये पुतिन, शरीफ, भुट्टोंचा समावेश..
जगातील एकूण १४० व्यक्तींनी पनामात आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून आले आहे. जागतिक नेत्यांमध्ये व्लादिमीर पुतिन, बेनझीर भुत्तो, नवाझ शरीफ यांची नावे त्यात आहेत. पुतिन यांच्या निकटच्या सहकाऱ्यांची नावे यात आहेत व २ अब्ज डॉलर्सचे गोपनीय व्यवहार बँका व कंपन्यांच्या मार्फत झाले आहेत. पुतिन यांचे नाव कागदपत्रात नाही.
युक्रेनचे अध्यक्ष, सौदी अरेबियाचे राजे , चित्रपट अभिनेता जॅकी चॅन यांचीही नावे कागदपत्रात आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कुटुंबीयांची खाती परदेशात असून ब्रिटिश पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून याच्या वडिलांचे खातेही आहे. आइसलँडच्या पंतप्रधानांचे परदेशात खाते असून लाखो डॉलर्स त्यात गुंतवलेले आहेत.
अमेरिकी सरकारने काळ्या यादीत टाकलेले ३३ लोक व कंपन्यांची नावे या कागदपत्रात असून उत्तर कोरिया, इराण, लेबनॉनचा हेजबोल्ला समूह यांच्याशी त्यांनी व्यवहार केले आहेत. कागदपत्रे १९७७ ते २०१५ दरम्यानची असून त्यात परदेशात दडवण्यात आलेल्या काळ्या पैशाचे घबाड उघड झाले आहे. विकिलिक्सने २०१० मध्ये पाच लाख गुप्त लष्करी फाइल्स उघड करून अमेरिकेला हादरा दिला होता, त्यात अडीच लाख केबल संदेशांचा समावेश होता. ते संदेश अफगाणिस्तान व इराकमधील कारवाईबाबत होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संबंधित काही लोक व जागतिक नेते, भारतातील काही प्रसिद्ध व्यक्ती, बार्सिलोनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांच्यासह अनेकांच्या परदेशातील आर्थिक व्यवहारांचा पर्दाफाश करणाऱ्या पनामा पेपर्समधील माहिती ‘दी इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केली.