पीटीआय, नवी दिल्ली

पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची कोठडीत असताना २४ वेळा वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत, त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही चिंता नाही, त्यामुळे आरोग्याच्या कारणावरून त्यांची सुटका करता येणार नाही, असे केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि पी. बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर सांगितले की, वांगचुक यांना ज्या कारणांवरून नजरकैदेत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे ती कारणे अद्याप कायम आहेत आणि केवळ आरोग्याच्या आधारावर त्यांची सुटका करणे शक्य नाही.

‘आम्ही त्यांच्या आरोग्याची २४ वेळा नियमित तपासणी केली आहे. ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. त्यांना थोडी पचनासंबंधी समस्या होती, त्यावर उपचार सुरू आहेत. चिंतेचे काहीही कारण नाही. अशा प्रकारे अपवाद करता येणार नाही. ज्या कारणांवरून नजरकैदेचा आदेश देण्यात आला आहे, ती कारणे अजूनही अस्तित्वात आहेत. आरोग्याच्या कारणावरून त्यांची सुटका करणे शक्य नाही. ते योग्यही ठरणार नाही. आम्ही सर्वतोपरी विचार केला आहे,’ असे मेहता यांनी खंडपीठाला सांगितले.

सुनावणीदरम्यान अतिरिक्त महान्यायअभिकर्ता के. एम. नटराज यांनी सांगितले की, आंदोलनांमध्ये वांगचुक यांची भूमिका ही भडकवणारी होती. त्यांनी नेपाळ तसेच अरब स्प्रिंगचे उदाहरण देत युवकांना चिथावणी दिली. नटराज म्हणाले की, वांगचुक यांनी नेपाळमधील हिंसक आंदोलनाचा उल्लेख करून भारतातही तसेच होऊ शकते, असे म्हटले.