केंद्र सरकारने लडाखमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले आहे. येथील आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेले लडाखचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’अंतर्गत (NSA) करण्यात आलेली ताब्यात घेण्याची कारवाई रद्द करण्यात आली आहे. वांगचुक यांना ताब्यात घेतल्याच्या सुमारे सहा महिन्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या पत्नी गितांजली जे. अंगमा यांनी दाखल केलेली याचिका तहकूब केल्याच्या काही दिवसात केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. अंगमा यांनी या याचिकेद्वारे त्यांनी वांगचुक यांच्यावर एनएसए अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईला आव्हान दिले होते. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि पी. बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणा १७ मार्च (मंगळवारी) सुनावणी होणार आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की ते या तारखेनंतर कोणताही युक्तीवाद ऐकून घेणार नाहीत.
२४ सप्टेंबर रोजी लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात चिथावणी देण्यात भूमिका असल्याच्या आरोपाखाली, सोनम वांगचुक यांना गेल्या वर्षी २६ सप्टेंबर रोजी एनएसए अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. या आंदोलनावेळी पोलिसांच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता.
केंद्र सरकारने निवेदन जारी करत सांगितले की, “सोनम वांगचुक यांना २६ सप्टेंबर २०२५ रोजी एनएसएच्या कलमांतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. वांगचुक यांनी या कायद्यांतर्गत असलेल्या स्थानबद्धतेच्या कालावधीचा जवळपास अर्धा वेळ पूर्ण केला आहे. लडाखमधील जनतेच्या आकांक्षा आणि चिंतांचे निराकरण करण्यासाठी सरकार तेथील विविध भागधारक आणि समुदाय नेत्यांशी सक्रियपणे चर्चा करत आहे. मात्र, सध्याचे बंद आणि आंदोलनाचे वातावरण समाजाच्या शांतताप्रिय स्वभावासाठी हानिकारक ठरले असून, याचा विद्यार्थी, नोकरी शोधणाऱ्यांवर, व्यावसायांवर, पर्यटक आणि एकूणच अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे.”
केंद्र सरकारने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून सरकारने सोनम वांगचुक यांची स्थानबद्धता तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय घडलं?
लडाखला राज्याचा दर्जा आणि घटनेतील सहावे परिशिष्ट लागू करावे, या मागणीसाठी लेहमध्ये आंदोलन सुरू होते. लडाखमधील विविध संघटनांच्या शिखर संस्थेचे (लेह ॲपेक्स बॉडी) वरिष्ठ सदस्य असलेले वांगचुक हे ‘कारगिल लोकशाही आघाडी’च्या (केडीए) मदतीने हे आंदोलन करण्यात येत होते. यावेळी आंदोलनात जाळपोळ झाली होती. यामध्ये वाहनांना आग लावण्यात आली तसेच भाजप कार्यालय पेटवून देण्यात आले होते. हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू तर ९० जण जखमी झाले.
या घटनेला केंद्राने वांगचुक यांना जबाबदार धरण्यात आले. पाठोपाठ वांगचुक यांनी स्थापन केलेल्या ‘स्टुडन्ट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’चा परवानाही रद्द केला गेला. तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
