Centre says fugitive economic offenders like Vijay Mallya Nirav Modi owe Rs 58000 Crore to banks details : भारतातील बँकांचे पैसे बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्या आर्थिक गुन्हेगारांबाबत केंद्र सरकाने सोमवारी अत्यंत महत्त्वाची महिती संसदेत सादर केली. सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, ही एकूण थकीत रक्कम ५८००० कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये मूळ रक्कम आणि इतक्या वर्षांमध्ये साठलेले व्याज या दोन्हींचा समावेश आहे.

केंद्र सरकारने सांगितले की, बँकांनी वेगवेगळ्या मालमत्तांची जप्ती आणि विक्रीतून १९१८७ कोटी रुपये इतकी रक्कम वसूल केली आहे.

एकूण ५३ घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये आर्थिक गुन्हेगार फरार झाले आहेत. यामध्ये भारतीय बँकिंग सिस्टिमची फसवणूक करणाऱ्या काही हाय-प्रोफाइल नावांचा देखील समावेश आहे. यामध्ये विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि संदेसरा फॅमिली यांचा समावेश आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, विजय मल्ल्या कडून विविध बँकांचे २२०६५ कोटी रुपये देणे बाकी आहेत. ज्यापैकी बँकांनी १४००० कोटी रूपयांहून अधिक रक्कम मालमत्ता जप्त आणि विक्री करून रिकव्हर केली आहेत. निरव मोदी याच्याकडून ९६५६ कोटी रुपये येणे बाकी आहेच आणि इतर असेच अनेक गुन्हेगार मिळून ५८००० कोटी रुपये येणे बाकी आहेत. बँकेने निरव मोदीकडून आत्तापर्यंत ५४५ कोटी रुपये परत मिळवले आहेत, असे सरकारने संसदेत सांगितले आहे.

सरकारने संसदेत सांगतिले की यादीमध्ये १५ मोठे फरार गुन्हेगार आहेत, ज्यापैकी दोन जणांनी कर्ज देणाऱ्यांबरोबर सेटलमेंट्स केल्या आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स अॅक्ट (FEOA) आणि प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत यांची मालमत्ता मिळवण्याचे , त्यांचे प्रत्यार्पण करण्याचे आणि जास्तीत जास्त वसूली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान सरकारने दिलेल्या या माहितीमधून मोठी कर्जे बुडवून देशातून पळून गेलेल्या आर्थिक गुन्हेगारांविरुद्ध होत असलेल्या कारवाईची व्याप्ती समोर येते.