Champai Soren Grandson Death Investigation and sudden demise details : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचा नातू वीर सोरेन हा मंगळवारी हिमाचल प्रदेशातील मनाली येथील एका होमस्टेमध्ये मृतावस्थेत आढळले, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. चंपाई सोरेन यांचा मुलगा बाबू लाल सोरेन यांचा मुलगा वीर सोरेन हा २० वर्षांचा होता. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

चंपाई सोरेन यांचा नातू वीर सोरेन २२ फेब्रुवारी रोजी मित्रांसह मनाली येथील सिमसा येथे आला होता. तेथे तो त्याच्या मित्रांसह एका होमस्टेमध्ये राहत होता. सोमवारी हे सर्व मित्र सेठान आणि हमता पासला गेले होते. संध्याकाळी ते पुन्हा होमस्टेला परतले. परतल्यावर वीर सोरेन झोपी गेला. त्याला तीव्र डोकेदुखी जाणवत होती. त्याच्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो उठला नाही. त्यानंतर त्याच्या मित्रांना खोलीतून मोठा आवाज आला. ते आवाजाच्या दिशेने धावत गेले. तेव्हा तो बेडवरून खाली पडलेला दिसला. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. त्याच्या तोंडातूनही फेस येऊ लागला. डॉक्टरांनी बराचवेळ त्याला सीपीआर दिला, पण त्याची प्राणज्योत मालवली.

मित्रांचा जबाब नोंदवणार

दरम्यान, झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन बुधवारी त्यांच्या कुटुंबियांसह मनालीला पोहोचले. नातवाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास त्यांनी नकार दिला. या मृत्यूप्रकरणात त्यांना कोणताही संशय नाही, असं पोलिसांनी सांगितलं. तसंच, मृत्यूच्या एक दिवस आधी तो हमता पास येथे गेला होता. त्यामुळे याप्रकरणी त्याच्या मित्रांचा जबाब नोंदवला जाणार आहे, असं मनालीचे उपाधिक्षक केजी शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

हेमंत सोरेन काय म्हणाले?

दरम्यान, याप्रकरणी चंपाई सोरेन यांनी एक्सवरूनही माहिती दिली. हिमाचल प्रदेशच्या मनाली येथे गेल्यावर त्याची प्रकृती बिघडली. त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. मात्र, नियतीच्या मनात वेगळंच होतं. वीरच्या जाण्याने आमचं कुटुंब प्रचंड दुःखी आहे, असं हेमंत सोरेन म्हणाले.

दरम्यान, मृत मुलाचे वडील बाबू लाल सोरेन हे मनालीला आलेले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. चंपाई सोरेन त्यांच्या इतर मुलांसोबत होते. चंपाई सोरेन यांनी २ फेब्रुवारी २०२४ ते ३ जुलै २०२४ पर्यंत झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.