झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता हेमंत सोरेन पुन्हा एकदा राज्याचा कारभार आपल्या हाती घेणार असल्याची चर्चा आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या (जेएमएम) नेतृत्वाखाली आघाडी सरकारमधील सर्व आमदारांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. सर्व आमदारांच्या संमतीनंतर जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंपई सोरेन यांच्या रांची येथील निवासस्थानी काही वेळापूर्वी आघाडी सरकारमधील सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी हेमंत सोरेन यांची जेएमएमच्या विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. चंपई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत सोरेन आता मुख्यमंत्रिपद स्वीकारतील. चंपई सोरेन यांनी काही वेळापूर्वी रांची येथील राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यापाठोपाठ हेमंत सोरेन राजभवनात दाखल झाले आहेत. हेमंत सोरेन उद्या (४ जुलै) तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. हेमंत सोरेन झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री बनणार आहेत. जेएमएममधील सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की पक्षाच्या बैठकीत चंपई सोरेन यांच्या जागी हेमंत सोरेन यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चंपई सोरेन यांनी राजीनामा दिला. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना २८ जून रोजी झारखंड उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. आंचल जमीन घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. १३ जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निकाल गेल्या आठवड्यात जाहीर केला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडची सूत्रं हाती घेतील अशी चर्चा सुरू झाली होती, जी आता खरी ठरत आहे. चंपई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत सोरेन आता झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हे ही वाचा >> Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरीत १२१ जणांचा बळी, भोले बाबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काही समाजकंटकांनी..” संक्तवसुली संचालनालयाने रांचीमध्ये लष्कराच्या ताब्यात असलेल्या ४.५५ एकर जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीची चौकशी सुरू केली होती. या प्रकरणी ईडीनं रांचीच्या बडागाईन झोनचे महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप प्रसाद यांना अटक केली होती. त्यांच्या राहत्या घरातून मोठ्या प्रमाणात सरकारी कागदपत्रं आणि मोबाईलही त्यावेळी जप्त करण्यात आले होते. त्यानंतर ईडीने आपला मोर्चा हेमंत सोरेन यांच्याकडे वळवला. त्यातून त्यांना ३१ जानेवारी २०२४ रोजी अटकही झाली होती. परिणामी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.