IPL Champak Robot Dog: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात बीसीसीआयने चंपक नावाच्या रोबोट श्वान कॅमेऱ्याची झलक दाखवली असून गेल्या काही सामन्यांपासून हा रोबोट श्वान क्रिकेटपटूंच्या आजूबाजूला दिसतो, कधी तो चिअर लिडर्सबरोबर नृत्य करतो तर सामना संपल्यानंतर क्रिडापटूंच्या मागे मागे चालत असतो. मात्र त्याच्या नावावरून आता नवीन वाद उद्भवला आहे. चंपक मासिकाने दिल्ली उच्च न्यायालयात बीसीसीआय विरोधात याचिका दाखल केली असून चंपक हे नाव वापरल्यामुळे ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन झाला असल्याचा आरोप केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून लहान मुलांमध्ये लोकप्रिय असणारे चंपक पाक्षिक आणि मासिक दिल्ली प्रेस पत्र प्रकाशन प्रा. लि.कडून प्रकाशित केले जात आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित होणारे मासिक प्रसिद्ध आहे. बीसीसीआयने रोबोट श्वानाला चंपक नाव दिल्यानंतर दिल्ली प्रेस ग्रुपने ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन झाल्याची याचिका दाखल केली. सदर याचिकेवर आज (३० एप्रिल) सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने मनाई आदेश देण्याचा निर्णय चार आठवड्यांसाठी राखून ठेवला.

अनेक वर्षांपासून चंपक नावाने पाक्षिक आणि मासिक काढले जात असून या नावाची नोंदणी झाल्याची माहिती दिल्ली प्रेस पत्र प्रकाशन प्रा. लि. कडून दिल्ली उच्च न्यायालयात देण्यात आली. बीसीसीआयने रोबोट कॅमेऱ्याला चंपक नाव देऊन ट्रेडमार्क नियमांचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले. बीसीसीआयने चंपक नाव देऊन त्याचा व्यावसायिक वापर केल्यामुळे आमच्यावर अन्याय होत असल्याची भूमिका प्रेस पत्र प्रकाशनाने व्यक्त केली.

रोबोट श्वान कॅमेऱ्याला चंपक नाव दिल्यामुळे कोणता व्यावसायिक लाभ बीसीसीआयला होत आहे? असा प्रश्न न्यायालयाने विचारला असता प्रेस पत्र प्रकाशनाच्या वकिलांनी सांगितले की, बीसीसीआयकडून चंपकची विविध माध्यमांवर जाहिरात केली जात आहे. त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. यावर न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्यांनी मनाई आदेश देण्याकरिता केवळ शाब्दिक दाखले न देता पुराव्यांसह युक्तिवाद करावा.

दुसरीकडे बीसीसीआची बाजू मांडणारे वकील जे. साई दीपक यांनी सांगितले की, चंपक हा शब्द कुणी नव्याने तयार केलेला नाही. तर ते एका फुलाचे नाव आहे. तसेच चंपक हे नाव केवळ एका पाक्षिक किंवा मासिकाचे नसून इतरही काही ठिकाणी या नावाचा वापर झालेला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, या मालिकेतही चंपक नावाचे पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चंपक हे नाव निवडताना सोशल मीडियावर पोल घेण्यात आला होता. चाहत्यांनीच या नावाला पसंती दिल्यानंतर रोबोटला हे नाव दिले गेले.

बीसीसीआयचे वकील दीपक यांनी पुढे असेही म्हटले की, चंपक हे नाव फक्त एका प्रकाशनापुरतेच आहे का? याचीही तपासणी झाली पाहीजे. न्यायालयने सदर प्रकरणावरील पुढील सुनावणी ९ जुलै रोजी होणार असल्याचे सांगितले.