अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणावरून वातावरण आणखी तापले आहे. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय संस्थांकडून होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग किंवा अन्य केंद्रीय संस्थेकडे हे प्रकरण सोपविण्याबाबत उत्तर प्रदेश सरकार विचार करत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अटकेत असलेल्यांच्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी चौकशी गरजेची आहे. या आठ संशयितांकडून आतापर्यंत ७९ लाख जप्त करण्यात आले आहेत. दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख आलोक कुमार यांनी चंपत राय यांच्याबाबतही भाष्य केलं आहे.

चंपत राय यांच्या विषयी आलोक कुमार यांनी काय म्हटलंय?

राम मंदिराच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे वेदना झाल्या आहेत. त्यामुळे जे लोक दोषी आहेत त्यांना लवकरात लवकर तुरुंगात धाडलं पाहिजे तर हिंदू समाजाला समाधान वाटेल. राम मंदिर देणगी प्रकरणात चंपत राय हे निष्काळजीपणा केल्याचे दोषी आहेत हे देखील विहिंपचे आलोक कुमार यांनी मान्य केलं आहे. राम मंदिर देणगी प्रकरणातील भ्रष्ट व्यवहारांकडे केलेली डोळेझाक हा चंपत राय यांचा गुन्हा असू शकतो. जे काही घडलंय ते दुर्दैवी आहे. या घटनेत कुणाचा बचाव करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही असंही आलोक कुमार यांनी म्हटलं आहे. याबाबत विशेष तपास समिती तपास करते आहे. त्यांचा अहवाल काय येतो ते पाहणंही महत्त्वाचं असेल असंही आलोक कुमार यांनी म्हटलंय.

विहिंपची भूमिका काय ?

राम मंदिराच्या देणगीवर जो डल्ला मारला गेला आहे त्याच्यासाठी विश्व हिंदू परिषद उत्तरदायी नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्याच्या दिवशीच आम्ही स्पष्ट केलं होतं की आता विश्व हिंदू परिषदेचं कार्य संपलं. मंदिराची निर्मिती करणं आणि त्यानंतर पुढची जबाबदारी घेणं हे विहिंपचं काम नाही. त्यामुळे या प्रकरणात देणगीवर जो डल्ला मारला गेला आहे ती जबाबदारी विहिंपची नाही असंही आलोक कुमार यांनी म्हटलं आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.