Mukul Roy Passes away : माजी रेल्वेमंत्री आणि एकेकाळी तृणमूल काँग्रेसचे नंबर दोनचे नेते मुकुल रॉय यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ७१ वर्षीय रॉय यांना कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते , त्यांनी पहाटे १.३० च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. मुकुल रॉय हे अनेक आजारांनी ग्रस्त होते, अशी माहिती त्यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
जानेवारी १९९८ मध्ये अस्तित्वात आलेल्या तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य रॉय हे एकेकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी होते. त्यांच्याप्रमाणेच रॉय यांनीही बंगालमध्ये युवा काँग्रेसमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. टीएमसीची स्थापना केल्यानंतर, त्यांनी बॅनर्जींसोबत पक्षात काम केले आणि त्यांनी पक्षातील सरचिटणीस पद भुषवलं. नंतर ते दिल्लीत पक्षाचा चेहरा म्हणून उदयास आले . २००६ मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले आणि २००९ ते २०१२ पर्यंत त्यांनी राज्यसभेत पक्षाचे नेते म्हणून काम पाहिले.यूपीए सरकारमध्ये, त्यांनी सुरुवातीला जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आणि त्यानंतर मार्च २०१२ मध्ये पक्षाचे सहकारी दिनेश त्रिवेदी यांच्या जागी रेल्वेमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
‘बंगालच्या राजकारणाचे चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे रॉय हे एकेकाळी तृणमूल काँग्रेसमध्ये नंबर दोनचे नेते आणि बंगाल व दिल्ली दोन्ही ठिकाणी पक्षाचे संचालक मानले जात होते. २०११ नंतर, जेव्हा तृणमूल काँग्रेसचे ३४ वर्षांचे डाव्या राजवटीचा अंत झाला आणि ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या, तेव्हा रॉय यांनी पक्षाला बळकटी देण्यात योगदान दिले.
मुकुल रॉय यांची राजकीय वाटचाल कशी होती?
शारदा चिट फाउंडेशन घोटाळा आणि नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरणात त्यांचे नाव आल्यानंतर ते वादात सापडले. त्यांच्या आणि पक्षातील अंतर वाढत असताना, ते नोव्हेंबर २०१७ मध्ये औपचारिकपणे भाजपामध्ये सामील झाले. रॉय यांनी राज्यात भाजपाला पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मदत करण्यासाठी स्थानिक पातळीवर काम केले आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला १८ जागा जिंकवून दिल्या. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना भाजपात आणण्यास त्यांनी मदत केली. तसंच, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत कृष्णनगर उत्तर येथून भाजपाचे आमदार म्हणून निवडून आले. पण लवकरच, त्यांनी भाजपाशी दुरावा निर्माण केला आणि अखेर जून २०२१ मध्ये ते तृणमूल काँग्रेसमध्ये परतले. २०२१ च्या निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल कलकत्ता उच्च न्यायालयाने १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत या ज्येष्ठ नेत्याला आमदार म्हणून अपात्र ठरवले.
शरद पवारांकडून श्रद्धांजली
“तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांच्या निधनाचे दुःखद वृत्त समजले. पश्चिम बंगालच्या राजकारणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राज्य आणि देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले”, असं शरद पवार म्हणाले.
“आपल्या प्रदीर्घ आणि अनुभवी राजकीय कारकिर्दीतून त्यांनी पश्चिम बंगालच्या राजकारणाला नवी दिशा दिली. ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, असंही त्यांनी म्हटलं.
