चंदिगढच्या बिलासपूरमध्ये भीषण अपघाताच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत भरधाव कारच्या धडकेत १६ वर्षाच्या शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की तो १० फूट फेकला गेला. दरम्यान दुसऱ्या घटनेत हायवा ट्रक २ मोटारसायकलींना धडकला. या घटनेत एकाच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

भरधाव कारची स्कुटीला धडक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेतील अपघात संजीवनी हॉस्पिटल जवळील वेरहाऊस रोड येथे रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या CG 10 BH 7752 या क्रमांकाच्या कारने समोरून येणाऱ्या स्कूटीला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की स्कूटी चालक १० फूट हवेत फेकला गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. फ्री प्रेस जर्नलने हे वृत्त दिलं आहे.

विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

या अपघातात अभिषेक नगर, मंगल येथील शालेय विद्यार्थी रुद्र प्रताप शर्मा (१६) हा गंभीर जखमी झाला. लोकांनी त्याला सिम्स रुग्णालयात दाखल केले पण दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले. गंभीर दुखापतीमुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कार चालक फरार

स्कूटीला धडक लागल्यानंतर कारचं नियंत्रण सुटल्यामुळे ती पुढे जाऊन शाळेच्या मिनी-बसवर आदळली. बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले, परंतु त्यातील प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. कार चालक व कारमधील इतर प्रवासी अपघातानंतर कार तिथेच सोडून पळून गेलेत, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कार अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचेही काही स्थानिकांनी दावा केला. मात्र, पोलिसांनी यावर अद्याप माहिती दिली नाही आहे.

पोलिसांनी कार जप्त केली असून सीसीटीव्हीची पडताळणी करत आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेऊन कारची कागदपत्रे तपासून चालकाचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार जर चालक अल्पवयीन आढळल्यास मोटार वाहन कायदा आणि इतर संबंधित तरतुदींनुसार कार मालक आणि इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.

दुसऱ्या अपघातात एकाचा मृत्यू

रविवारी दुपारी कस्तुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मल्हार चौकी परिसरात नवोदय विद्यालयाजवळ एका खासगी कंपनीच्या हायवा ट्रकने दोन मोटारसायकलींना धडक दिली. तीन मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाल्याने स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले. शैलू मिरी (४५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर संतोष भैना (३०) आणि धंनजय दहरे (२६) यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून ते या अपघाताचा तपस करत आहेत.