पीटीआय, गोंडा/नवी दिल्ली चंडीगड-दिब्रुगड एक्स्प्रेस उत्तर प्रदेशातील गोंडानजीक घसरल्याने झालेल्या अपघातात दोन जणठार तर ३४ जण जखमी झाले. एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्याचे गोंडाच्या जिल्हाधिकारी नेहा शर्मा यांनी स्पष्ट केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी मदतकार्य वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मोतीगंज आणि झिलई स्टेशनदरम्यान गोंडा जंक्शनजवळ दुपारी अडीच वाजता हा अपघात झाला. चंडीगडहून बुधवारी रात्री ही गाडी (क्र १५९०४) रवाना झाली होती. प्रवाशांना तातडीने मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थानिक प्रशासनाला दिले. या घटनेत २० जण जखमी झाल्याचे उत्तर प्रदेशचे मदत आयुक्तांनी सांगितले. हेही वाचा >>>बांगलादेशात आंदोलनाचा भडका; नोकऱ्यांतील आरक्षण हटविण्याची मागणी, हिंसाचारात १८ ठार एकवाक्यतेचा अभाव रेल्वे घसरण्यापूर्वी लोको पायलटला मोठा आवाज आला. अपघातामधील मृत्यूंच्या संख्येबाबत मतभिन्नता आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चार जण ठार झाल्याचे वृत्तसंस्थेला सांगितले. रेल्वे अधिकाऱ्यांनी दोन जण दगावल्याचे नमूद केले. अपघातानंतर पाच तासांनी जिल्हाधिकारी नेहा शर्मा यांनी एकाचा मृत्यू झाल्याचे नमूद केले.