Chandigarh Medical Store Cashier Shot Dead: चंदीगडमधील सेक्टर ११ मधील एका मेडिकल स्टोअरमध्ये शनिवार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. चेहरा लपवून आलेल्या दोन हल्लेखोरांनी दुकानात घुसून कॅशियर जानकी दास याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी जानकी दासवर तब्बल १३ राऊंड फायर केले. गंभीर जखमी झालेल्या जानकी दासचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, हत्येनंतर आरोपी बाहेर दुचाकीवर वाट पाहत असलेल्या तिसऱ्या साथीदारासह फरार झाले. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना दुपारी अडीच वाजता घडली. चेहरा लपवलेले दोघेजण मेडिकल स्टोअरमध्ये शिरले आणि त्यांनी जानकी दासवर गोळ्या झाडल्या आणि मग ते तिथून पळून गेले. दोन्ही हल्लेखोरांचा तिसरा साथीदार बाहेर दुचाकीवर वाट पाहत होता आणि हल्ल्यानंतर हे तिघे एकत्र पळून गेले.
सिनियर सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस सुमेर प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस या हल्ल्याच्या सर्व संभाव्य कारणांचा शोध घेत आहेत. तसेच आरोपींना शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे.
पोलीस काय म्हणाले?
“ही घटना आज दुपारी २:३० वाजता घडली. चेहरा लपवलेले दोघेजण दुकानात आले. त्यांनी दुकानातील कर्मचारी जानकी दास याच्यावर गोळ्या झाडल्या आणि मग ते घटनास्थळावरून पळून गेले. त्यांचा एक साथीदार बाहेर दुचाकीवर त्यांची वाट पाहत होता, हल्ल्यानंतर हे तिघेही दुचाकीवर पळून गेले,” असं एसएसपी सुमेर प्रताप सिंह म्हणाले. “या प्रकरणाचा तपास सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत. या दुकान मालकाला याआधी कोणतीही धमकी मिळाली नव्हती, जानकी दासचा मृत्यू झाला आहे. एकूण १३ राऊंड गोळ्या झाडल्या गेल्या. जानकी दास धनास येथील रहिवासी होता आणि या दुकानात कॅशियर म्हणून काम करत होता.”
“दुचाकीवर आलेला माणूस बाहेरच थांबला होता. आम्ही सीसीटीव्ही फुटेज गोळा करून त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवत होतो. आम्ही संपूर्ण शहरात नाकाबंदी सुरू केली असून त्यांना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,” असंही त्यांनी सांगितलं. जानकी दासवर गोळीबार नेमका कशामुळे झाला, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही.
