Viral Video : सध्या सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात, तर काही व्हिडीओ थरकाप उडवणारे असतात. आता अशाच एका अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणाला भरधाव मर्सिडीजने चिरडल्याचं दिसत आहे. ही घटना चंदीगडमध्ये घडली आहे.

नेमकं घटना काय?

चंदीगडमधील सेक्टर २६ या ठिकाणी असलेल्या एका नाईट क्लबबाहेर शनिवारी संध्याकाळी एका भरधाव मर्सिडीज कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मर्सिडीज कारचा चालक कारसह घटनास्थळावरून फरार झाला आहे.

या प्रकरणात आता चंदीगडच्या सेक्टर २६ येथील पोलिसांनी तपास सुरू केला असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे. या घटनेत जखमींची ओळख अमनजात आणि अलांस प्रीत (रा.चंदीगड) अशी पटली आहे. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी सेक्टर २६ मधील एका नाईट क्लबमधून हे दोन तरुण बाहेर पडत होते. यावेळी त्या दोघांनाही एका भरधाव मर्सिडीज कारने जोराची धडक दिली. एवढंच नाही तर घटनेनंतर भरधाव मर्सिडीज कार पुन्हा रिव्हर्स घेऊन एका व्यक्तीला चिरडण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसत आहे. यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ झाला आणि अनेकांनी आरडाओरड करत गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी गाडीसह घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेचा व्हिडीओ त्या ठिकाणी असलेल्या काही जणांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या व्हायरल व्हिडीओमध्ये मर्सिडीजच्या मागील बाजूची काच फुटलेली दिसत आहे. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला असून मर्सिडीज कार आणि चालकाची ओळख पटवण्यात येत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, मर्सिडीज चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला लवकरच अटक केली जाईल.