नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी स्वतःचा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ‘आझाद हिंद पार्टी’ असे या पक्षाचे नाव असणार असून, देशातील तरुणांना विशेषतः जेन झी पिढीला राजकारणात सहभागी करून घेण्यावर पक्षाचा भर असेल. दिल्लीतील जंतर-मंतरवरील जेन झी आंदोलनामधून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे बोस यांनी सांगितले. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
भाजपा आणि तृणमूल काँग्रेसनंतर आता स्वतःचा पक्ष
चंद्र कुमार बोस यांचा राजकीय प्रवास गेल्या काही वर्षांत अनेक वळणे घेत आला आहे. त्यांनी २०१६ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. सुमारे सात वर्षे पक्षात राहिल्यानंतर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र काही काळातच वैयक्तिक कारण देत तृणमूल काँग्रेसमधूनही बाहेर पडले. भाजपामध्ये असताना नेताजींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ‘आझाद हिंद मोर्चा’ स्थापन करण्याचे आश्वासन आपल्याला देण्यात आले होते, असा दावा बोस यांनी केला. मात्र सात वर्षे वाट पाहूनही हा मोर्चा स्थापन झाला नाही, त्यामुळे आपण भाजपा सोडल्याचे त्यांनी सांगितले.
तृणमूल काँग्रेस सोडण्यामागेही राजकीय असमाधान
भाजप सोडल्यानंतर बोस यांनी २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नेताजींच्या विचारांवर काम करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमधूनही राजीनामा दिला. मुख्य प्रवाहातील पक्षांमधील ‘कंटाळवाणे आणि खालच्या पातळीचे राजकारण’ आपल्याला मान्य नसल्याची टीका त्यांनी केली.
जेन झी मध्ये राजकीय बदलाची इच्छा – चंद्र कुमार बोस
चंद्र कुमार बोस यांच्या मते, देशातील तरुण सध्याच्या राजकीय व्यवस्थेला कंटाळले आहेत. भ्रष्टाचार, शिक्षण, आरोग्य व्यवस्था आणि उद्योग क्षेत्रातील समस्या यामुळे तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जंतर-मंतरवरील जेन झी आंदोलनाचा उल्लेख करत ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर जवळपास ८० वर्षांनी तरुण पुन्हा एकदा आपल्या हक्कांसाठी पुढे येत आहेत. याच तरुण शक्तीला राजकीय व्यासपीठ देण्याचा प्रयत्न ‘आझाद हिंद पार्टी’च्या माध्यमातून केला जाईल.
नेताजींच्या विचारांवर पक्षाची वाटचाल
“एप्रिल २०२६ मध्ये मला सांगण्यात आले की, त्यांचा नेताजींच्या विचारसरणीवर विश्वास आहे आणि मी पक्षात काम करून त्यांची विचारसरणी पसरवू शकतो,” असे बोस म्हणाले. पुढे ते म्हणाले की, आझाद हिंद पार्टी पुरोगामी, समावेशक आणि धर्मनिरपेक्ष राजकारणाशी बांधील असलेल्या तरुणांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. देशाच्या उभारणीत तरुणांचा सहभाग वाढवणे हा पक्षाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांमधील असलेला असंतोष आणि नाराजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वारशाचे आकर्षण यांचे रूपांतर ‘आझाद हिंद पार्टी’ निवडणुकीतील पाठिंब्यात करू शकेल का, हे चंद्र कुमार बोस यांचे मोठे आव्हान असेल.
