Chandra Kumar Bose Quits TMC : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षात प्रवेश केला होता. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांबद्दल आपला भ्रमनिरास झाला असून भाजपा आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल पक्षात काहीही फरक दिसत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
भाजपा-टीएमसी एकाच नाण्याच्या दोन बाजू
चंद्र कुमार बोस यांनी पीटीआयला सांगितलं की, “मी फॉरवर्ड ब्लॉक, भाजपा आणि टीएमसीमध्ये राहिलो आहे. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांबद्दल माझा भ्रमनिरास झाला आहे. ते सर्व सारखेच आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माझं राजकारण नेताजींच्या विचारसरणीवर आधारित आहे. आम्हाला सर्वसमावेशक राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि विकास या त्यांच्या तत्त्वांवर आधारित एक नवीन राजकीय मंच तयार करायचा आहे. नेताजींच्या आदर्शांवर आधारित पक्ष स्थापन करण्यासाठी एकत्र येत असलेल्या तरुणांना मी मार्गदर्शन करेन”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
चंद्र कुमार बोस यांची राजकीय पार्श्वभूमी
चंद्रकुमार बोस हे पूर्वी नेताजींनी स्थापन केलेल्या फॉरवर्ड ब्लॉकबरोबर कार्यरत होते. २०१६ मध्ये जेव्हा भाजपाने पश्चिम बंगालमध्ये आपली राजकीय उपस्थिती वाढवली, तेव्हा त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांची पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी २०१६ ची विधानसभा निवडणूक आणि २०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढवली. त्यानंतर भाजपासोबतचे त्यांचे संबंध ताणले गेले. २०२० मधील संघटनात्मक फेरबदलादरम्यान त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आणि त्यांनी पक्ष नेतृत्वासोबतचे मतभेद उघडपणे मांडण्यास सुरुवात केली. भाजप नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शरदचंद्र बोस यांनी पुरस्कार केलेल्या सर्वसमावेशक राष्ट्रवादी आदर्शांना पुढे नेण्याचे आपले आश्वासन पाळण्यात अपयशी ठरल्याचा दावा करत बोस यांनी २०२३ मध्ये भाजपा सोडली.
या वर्षी एप्रिलमध्ये जेव्हा त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला, तेव्हा बोस यांनी भाजपावर फूट पाडणाऱ्या राजकारणाचा आरोप करत टीका केली होती आणि भाजपाचा दृष्टिकोन संविधानाच्या भावनेच्या विरोधात असल्याचं म्हटलं होतं. टीएमसीमध्ये प्रवेश करताना ते म्हणाले होते, “जेव्हा मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, तेव्हा मला असं सांगण्यात आलं होतं की मी शरदचंद्र बोस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी काम करू शकेन, जी सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्ष आहे. संविधानानुसार भारत हे एक सार्वभौम, लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक आहे.” त्यांनी भाजपामध्ये जाण्याचा आपला निर्णय ही एक चूक असल्याचं म्हटलं होतं आणि टीएमसी घटनात्मक मूल्ये आणि सर्वसमावेशक राजकारण टिकवून ठेवण्यासाठी व्यासपीठ प्रदान करेल अशी आशा व्यक्त केली होती.
