ममता बॅनर्जींचा भवानीपूरमध्ये पराभव करणारे सुवेंदू अधिकारी हे भाजपाचे पश्चिम बंगालमध्ये जायंट किलर ठरले. दरम्यान सुवेंदू अधिकारींच्या स्वीय सचिवाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. चंद्रनाथ रथ असं त्यांचं नाव आहे. ममता बॅनर्जींचा निवडणुकीत जो पराभव झाला त्यात चंद्रकांत रथ यांचा सिंहाचा वाटा होता. यानंतर आता भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारींची प्रतिक्रिया समोर आली. दरम्यान प्रत्यक्षदर्शीने या घटनेचा थरार सांगितला आहे.
सुवेंदू अधिकारी नेमकं काय म्हणाले?
दोन ते तीन दिवस रेकी करुन चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. जी घटना घडली ती अत्यंत क्लेशदायक आहे. सुनियोजित कट रचून चंद्रनाथ रथ यांची हत्या केली गेली आहे. दिल्लीतल्या भाजपा नेत्यांशी, आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशीही आमची चर्चा झाली. ही घटना अत्यंत दुःखदायक आहे असं त्यांनीही सांगितलं. त्यांनाही धक्का बसला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही याबाबत माहिती घेतली आहे. आम्ही चंद्रनाथ रथ यांच्या कुटुंबाच्या पाठिशी आहोत. विविध आमदारही आमच्या साथीला आले आहेत. पोलीस त्यांच्या परिने तपास करत आहेत. त्यांच्या हातात काही धागेदोरे आले आहेत. महाजंगलराज १५ वर्षे सुरु होतं. त्याची फळं आता आमच्या माणसांनाही भोगावी लागत आहेत. भाजपा या सगळ्यांचा सफाया करणार आहे असं सुवेंदू अधिकारींनी म्हटलं आहे.

सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येबाबत प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
चंद्रनाथ यांची कार माझ्या कारजवळून गेली आणि अचानक रस्त्यात थांबली. त्यावेळी बाईकवरुन आलेल्या व्यक्तीने गोळीबार सुरु केला. त्याने अनेक गोळ्या चालवल्या. त्यानंतर प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की जो व्यक्ती गोळीबार करत होता तो एखादा शूटर वाटत होता. कारण त्याने तातडीने गोळ्या चालवून तिथून पळ काढला. त्याने गोळ्या एकदम जवळून चालवल्या. मी दोन राऊंडचा आवाज ऐकला. ही घटना रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान घडली. या घटनेपासून २०० ते ३०० मीटरवर हॉस्पिटल आहे. लोकांनी जखमी लोकांना तातडीने त्या रुग्णालयात दाखल केलं. चंद्रनाथ रथ यांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यांचा त्यापूर्वीच मृत्यू झाला. चंद्रनाथ यांच्या चालकालाही गोळ्या लागल्या होत्या असं प्रत्यक्षदर्शीने ANI ला सांगितलं.
कोण होते चंद्रनाथ रथ?
चंद्रनाथ रथ हे ४१ वर्षांचे होते. तसंच ते पूर्व मेदिनापूर जिल्ह्यातील चांदीपूरचे रहिवासी होते.
चंद्रनाथ रथ यांचं शिक्षण राहरा रामकृष्ण मिशनमध्ये झालं होतं. विद्यार्थी दशेत रामकृष्ण मिशनच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी संन्यास घेण्याचाही विचार केला होता. मात्र नंतर ते वायुसेनेत गेले.
सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ हे आधी वायुसेनेत होते. वायुसेनेतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी काही दिवसांसाठी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं.
कॉर्पोरेट सेक्टरकडून ते हळू हळू राजकारणाकडे वळले. २०१९ च्या सुमारास सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळीच चंद्रनाथ रथ त्यांच्या टीममध्ये सहभागी झाले.
सुरुवातीला चंद्रनाथ यांनी मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळल्या. सुवेंदू अधिकारी हे नंतर भाजपात गेले, त्यावेळीही चंद्रनाथ रथ त्यांच्या टीममध्ये महत्त्वाचा भाग होतेच.
सुरुवातीला सुवेंदू अधिकारी यांच्याप्रमाणेच चंद्रनाथ रथ आणि त्यांचं कुटुंब तृणमूल काँग्रेसमध्ये होते. सुवेंदू अधिकारी भाजपात गेले तेव्हा चंद्रनाथ रथ आणि त्यांचं कुटुंबही भाजपात गेलं.
चंद्रनाथ रथ हे सुमारे २० वर्षांपासून सुवेंदू अधिकारांसह होते. त्यांना साथ देत होत. त्यांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वयक म्हणूनही काम केलं. नंतर ते सुवेंदू अधिकारींचे खूप निकटवर्तीय झाले.
चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा घटनाक्रम काय होता?
- कारचा बराच वेळ पाठलाग: मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ आणि बुद्धदेव यांच्या कारचा बराच काळ पाठलाग केला.
- कारचा वेग कमी होताच गोळीबार: चंद्रनाथ आपल्या घरी जात होते. वाटेत बिर्याणी खाण्यासाठी गाडी थांबवली आणि त्याच वेळी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला.
- हल्ला कसा झाला?: पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, हल्लेखोरांनी आधी विंडशील्डवर गोळी झाडली. त्यानंतर पुढच्या सीटवर बसलेल्या चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळ्या झाडल्या.
- हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच मृत्यू: ही घटना मध्यमग्राममधील जेसोर रोडवर दोहरिया जवळ घडली. घटनेनंतर स्थानिक लोकांनी चंद्रनाथ यांना जवळच्या नर्सिंग होममध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
