भारतीय जनता पक्षाचे बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची म्हणजेच चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडल्या गेल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यात ही घटना घडली. चंद्रनाथ रथ हे सुवेंदू अधिकारींचे निकटवर्तीय तर होतेच शिवाय ते त्यांचे स्वीय सचिवही होते. ज्याप्रमाणे रथ यांची हत्या झाली त्याचप्रमाणे २०१३ मध्येही एक घटना घडली होती.

२०१३ मध्ये काय घडलं होतं?

२०१३ मध्ये सुवेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसमध्ये होते. या कालावधीत ते खासदार होते. त्यावेळी त्यांचे स्वीय सचिव असलेल्या प्रदीप झा यांचा मृतदेह कोलकाता येथील स्ट्रँग रोड भागात मिळाला होता. ३ ऑगस्ट २०१३ या दिवशी ही घटना घडली होती. अधिकारी यांचे पीए म्हणून झा काम करत होते. तसंच हाजी नरुल इस्लाम हे तृणमूलचे आमदार होते त्यांच्यासाठीही झा काम करायचे.

प्रदीप झा यांचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला होता

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार प्रदीप झा हे २०१३ मध्ये ४२ वर्षांचे होते, तसंच बरसा या ठिकाणी ते वास्तव्यास होते. त्यांचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला होता. ३ ऑगस्ट २०१३ ला कोलकाता पोलीस ठाण्याच्या कंट्रोल रुमला ही माहिती मिळाली होती की एक माणूस रस्त्यात बेशुद्ध झाला आहे. पोलीस त्या ठिकाणी पोहचले तेव्हा त्यांनी पाहिलं की ते प्रदीप झा होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण प्रदीप झा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. सुवेंदू अधिकारी यांच्याकडे प्रदीप झा काम करु लागले होते तेव्हा आमदार हाजी नुरुल इस्लाम म्हणाले होते की आता सुवेंदू अधिकारींसह एक हुशार आणि चाणाक्ष माणूस काम करु लागला आहे.

कोण होते प्रदीप झा?

चंद्रकांत रथ यांच्याप्रमाणेच प्रदीप झा यांचंही वर्णन करता येईल. असा माणूस ज्याच्यावर सुवेंदू अधिकारी पूर्ण पणे अवलंबून राहू शकत होते. त्यांचा प्रचंड विश्वासही होता. प्रदीप झा आहेत म्हटलं की टेन्शन नाही असंही अधिकारी यांना वाटत असे. सुवेंदू अधिकारी कार्यालयात नसतानाही त्यांच्यासाठी समन्वयाचं काम प्रदीप झा करायचे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. अधिकारी यांच्या सगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांची आणि कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याची जबाबदारी त्या काळात प्रदीप झा यांच्यावर होती.

प्रदीप झा यांच्या शरीरात आढळलं होतं अल्कोहोल?

२०१३ मध्ये काही बातम्या समोर आल्या होत्या. ज्यानुसार प्रदीप झा यांच्या शरीरात अल्कोहोलचं प्रमाण आढळून आलं होतं. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली की त्यांच्या शरीरात ७०० मिली अल्कोहोल आढळून आलं होतं. तसंच त्यांच्या तोंडामध्ये काही अन्नाचे कण आढळून आले होते. रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतरही सुवेंदू अधिकारी यांना धक्का बसला होता. आता त्यांच्या स्वीय सचिवाची म्हणजेच चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आली. ज्यामुळे बंगालच्या रक्तरंजित राजकारणाचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. या घटनेने प्रदीप झा यांच्या मृत्यूची आठवणही ताजी केली आहे.

चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा घटनाक्रम काय होता?

  • कारचा बराच वेळ पाठलाग: मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ आणि बुद्धदेव यांच्या कारचा बराच काळ पाठलाग केला.
  • कारचा वेग कमी होताच गोळीबार: चंद्रनाथ आपल्या घरी जात होते. वाटेत बिर्याणी खाण्यासाठी गाडी थांबवली आणि त्याच वेळी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला.
  • हल्ला कसा झाला?: पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, हल्लेखोरांनी आधी विंडशील्डवर गोळी झाडली. त्यानंतर पुढच्या सीटवर बसलेल्या चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळ्या झाडल्या.
  • हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच मृत्यू: ही घटना मध्यमग्राममधील जेसोर रोडवर दोहरिया जवळ घडली. घटनेनंतर स्थानिक लोकांनी चंद्रनाथ यांना जवळच्या नर्सिंग होममध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाचे सर्वात मोठे दावेदार

सुवेंदू अधिकारी हे बंगालमधले भाजपाचे मोठे नेते आहेत.

भाजपात येण्यापूर्वी ते तृणमूल काँग्रेसमध्ये होते.

पश्चिम बंगालच्या राजकारणातला एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे सुवेंदू अधिकारी आहेत.

सुवेंदू अधिकारींनी ममता बॅनर्जींचा त्यांच्या भवानीपूर या मतदारसंघात पराभव केला आणि त्यामुळे भाजपाला बंगालमध्ये पाय रोवणं सोपं झालं.

२००७ मध्ये सुवेंदू अधिकारींनी नंदीग्रामचं आंदोलन केलं होतं. ज्यामुळे ते प्रचंड चर्चेत आले. ममता बॅनर्जींच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत होते.

मात्र सुवेंदू अधिकारींनी डिसेंबर २०२० मध्ये भाजपात प्रवेश केला आणि आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदासाठी ते सर्वात मोठे दावेदार आहेत.

बंगालमध्ये भाजपाने निर्विवाद सत्ता आणली आहे. सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार ही उत्सुकताही कायम आहे. त्याच्या घोषणेच्या आतच सर्वात मोठे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची क्रूरपणे हत्या करण्यात आली. ज्यामुळे बंगाल हादरला आहे.