पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जायंट किलर ठरलेले भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण बंगाल हादरलं आहे. चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री मध्यमग्राम या ठिकाणी गोळ्या झाडून हल्लेखोरांनी हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण पश्चिम बंगालमधून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रथ यांच्या कुटुंबीयांनी या हत्येच्या घटनेमागे राजकीय सूड असल्याचा आरोप केला. तसेच भाजपा नेत्यांनी तृणमूल काँग्रेसवर राज्यात हिंसाचाराचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण घटनेबाबत बोलताना चंद्रनाथ रथ यांच्या आईने गंभीर आरोप केले आहेत.

चंद्रनाथ रथ यांच्या आई हसिरानी रथ यांनी चंद्रनाथ यांच्या हत्येला जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तसेच सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्यापासून आपल्या कुटुंबाला धोका असल्याचा आरोप हसिरानी रथ यांनी एएनआयशी बोलताना केला. ‘हल्लेखोरांना फाशी नाही, जन्मठेपेची शिक्षा व्हावी’, अशी मागणी चंद्रनाथ रथ यांच्या आईने केली आहे.

चंद्रनाथ रथ यांच्या आईने काय म्हटलं?

“आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. हल्लेखोरांना फाशी नाही, तर जन्मठेपेची शिक्षा व्हावी. भाजपा सत्तेवर आल्यामुळे त्यांनी हे केलं आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष आणि नेते राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत वारंवार बोलत आहेत. पण भाजपा सत्तेवर आल्याने ते (टीएमसी) वेडे झाले आहेत. काही दिवासांपूर्वी टीएमसी पक्षातील जे विविध चिथावणीखोर वक्तव्ये करणारे लोक होते ते म्हणत होते की ४ तारखेनंतर दिल्लीचे वडीलसुद्धा आम्हाला वाचवू शकणार नाहीत आणि त्यांनी तेच केलं”, असं हसिरानी रथ यांनी म्हटलं आहे.

“जर माझा मुलगा अपघातात मरण पावला असता, तर मला एवढं दुःख झालं नसतं. पण गुंडांनी ज्या प्रकारे माझ्या मुलाचा छळ करून त्याला ठार मारलं. ते सर्व तृणमूल काँग्रेसने रचलेलं षडयत्र आहे. सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा पराभव केल्यापासून माझ्या कुटुंबाला अशा धमक्या येत होत्या”, असं चंद्रनाथ रथ यांच्या आईने म्हटलं आहे.

चंद्रनाथ यांच्या हत्येबाबत प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?

“चंद्रनाथ यांची कार माझ्या कारजवळून गेली आणि अचानक रस्त्यात थांबली. त्यावेळी बाईकवरुन आलेल्या व्यक्तीने गोळीबार सुरु केला. त्याने अनेक गोळ्या चालवल्या. त्यानंतर प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की जो व्यक्ती गोळीबार करत होता तो एखादा शूटर वाटत होता. कारण त्याने तातडीने गोळ्या चालवून तिथून पळ काढला. त्याने गोळ्या एकदम जवळून चालवल्या. मी दोन राऊंडचा आवाज ऐकला. ही घटना रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान घडली. या घटनेपासून २०० ते ३०० मीटरवर हॉस्पिटल आहे. जखमी लोकांना तातडीने त्या रुग्णालयात दाखल केलं. चंद्रनाथ रथ यांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यांचा त्यापूर्वीच मृत्यू झाला. चंद्रनाथ यांच्या चालकालाही गोळ्या लागल्या होत्या”, असं प्रत्यक्षदर्शीने ANI ला सांगितलं.

कोण होते चंद्रनाथ रथ?

चंद्रनाथ रथ हे ४१ वर्षांचे होते. तसंच ते पूर्व मेदिनापूर जिल्ह्यातील चांदीपूरचे रहिवासी होते. चंद्रनाथ रथ यांचं शिक्षण राहरा रामकृष्ण मिशनमध्ये झालं होतं. विद्यार्थी दशेत रामकृष्ण मिशनच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी संन्यास घेण्याचाही विचार केला होता. मात्र नंतर ते वायुसेनेत गेले. वायुसेनेतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी काही दिवसांसाठी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं. कॉर्पोरेट सेक्टरकडून ते हळू हळू राजकारणाकडे वळले. २०१९ च्या सुमारास सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळीच चंद्रनाथ रथ त्यांच्या टीममध्ये सहभागी झाले. सुरुवातीला चंद्रनाथ यांनी मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळल्या. चंद्रनाथ रथ हे सुमारे २० वर्षांपासून सुवेंदू अधिकारी यांच्याबरोबर होते. त्यांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वयक म्हणूनही काम केलं होतं, नंतर ते सुवेंदू अधिकारींचे खूप निकटवर्तीय झाले होते.

Chandranath Rath mother Hasirani statement

चंद्रकांत रथ यांची हत्या कशी झाली? घटनाक्रम समोर

चंद्रनाथ रथ हे घरी परतत असताना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मोटारसायकलस्वार हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यांनुसार, एका चारचाकी वाहनाने आधी रथ यांची गाडी ओव्हरटेक केली आणि गाडी पुढे घेऊन गाडीचा वेग कमी केला. त्यानंतर पाठिमागून एक बाईकस्वार आला आणि रथ यांच्या कारच्या अगदी जवळ जाऊन गोळीबार केला. या घटनेत रथ हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर रथ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवेळी रथ यांच्या चालकालाही गोळी लागल्याने तो देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.