पीटीआय, नवी दिल्ली

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे साहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. सागर सोनकर आणि साहीब सोनकर अशी त्यांची नावे असून ते दोघे भाऊ आहेत.

या अटकेमुळे प्रतिस्पर्धी तृणमूल काँग्रेसचा या हत्येशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यातील सागर सोनकर हा २०२० पर्यंत तृणमूल काँग्रेसच्या आमदारासाठी काम करत होता. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून तो रथ याचा सहकारी म्हणून काम करू लागला. राज्यात भाजपला बहुमत मिळवून देणारा २०२६ चा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर तीन दिवसांनी माध्यमग्राम येथे रथ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्लेखोरांंना सागरने पैसे दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. तत्पूर्वी काही महिन्यांपासून सागर हा तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे त्याच्या दूरध्वनी तपशिलावरून उघड झाले आहे.

आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणी गोळीबार करण्यात सहभाग असलेल्या सहा हल्लेखोरांना आणि हत्येच्या कटात मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. एक संशयित आरोपी अजूनही फरार आहे.