पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री मध्यमग्राम या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपींचा शोध पोलीस घेत असून पुढील कारवाई करत आहेत.

सुवेंदू अधिकारींचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या नेमकं कशी झाली? घटनेवेळी काय घडलं आणि घटनेनंतर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत काय आढळून आलं? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांच्या गाडीला आधी घेरलं आणि त्यानंतर अंदाधुंद गोळीबार केला आणि यातच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

चंद्रकांत रथ यांची हत्या कशी झाली? घटनाक्रम समोर

सुवेंदू अधिकारी यांचे पीए रथ यांच्या हत्येच्या घटनेची आता उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ही घटना घडली असून या घटनेमुळे भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

वृत्तानुसार, चंद्रनाथ रथ हे घरी परतत असताना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मोटारसायकलस्वार हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यांनुसार, एका चारचाकी वाहनाने आधी रथ यांची गाडी ओव्हरटेक केली आणि गाडी पुढे घेऊन गाडीचा वेग कमी केला. त्यानंतर पाठिमागून एक बाईकस्वार आला आणि रथ यांच्या कारच्या अगदी जवळ जात गोळीबार केला. या घटनेत रथ हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर रथ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवेळी रथ यांच्या चालकालाही गोळी लागल्याने तो देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेवेळी काय घडलं? डॉक्टरांनी काय सांगितलं?

सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ हे बुधवारी रात्री उशिरा घरी परतत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर रथ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या छातीत दोन आणि पोटात एक गोळी लागली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

चालकही जखमी, रुग्णालयात उपचार सुरू : चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार झाल्याच्या घटनेत रथ यांचा चालकही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावरही कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार झाल्याच्या घटनेबाबत एका प्रत्यक्षदर्शीने एएनआयशी बोलताना म्हटलं की, “रथ यांची गाडी रस्त्याच्या मधोमध अचानक थांबल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या एका हल्लेखोराने जवळून गोळीबार केला. दोन गोळ्या झाडल्यानंतर तो लगेच पळून गेला. ही घटना पूर्वनियोजित असल्यासारखी वाटत होती.”

पोलिसांकडून बनावट नंबर प्लेटची कार आणि काडतुसं जप्त

पश्चिम बंगालचे डीजीपी सिद्ध नाथ गुप्ता यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितलं की, “पोलिसांनी घटनास्थळावरून काही बंदुकीच्या गोळ्या आणि वापरलेली काडतुसं जप्त केली आहेत. या हल्ल्यात वापरण्यात आलेली एक चारचाकी गाडी ताब्यात घेण्यात आली असून या गाडीची नंबर प्लेट बनावट असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच तपासाचा भाग म्हणून सीसीटीव्हीची तपासणी आम्ही करत आहोत.”

पोलीस सूत्रांनी सांगितलं की, “जप्त केलेल्या वाहनामधून नमुने गोळा करण्यात आले आहेत. हल्लेखोरांना ओळखण्यासाठी आणि हत्येच्या घटनेचं कारण तपासण्यासाठी तपास अधिकारी घटनास्थळाच्या आसपास असणाऱ्या सर्व सीसीटीव्हीची तपासणी करत आहे.”

Suvendu Adhikari PA Chandranath Rath Murder

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबाराची घटना घडल्यानंतर शेकडो भाजपा कार्यकर्ते रथ यांना दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयाबाहेर जमले होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेतील आरोपीच्या अटकेची मागणी करत तृणमूल काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, परिस्थिती जास्त चिघळू नये आणि कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.

टीएमसीकडून घटनेचा निषेध आणि CBI चौकशीची मागणी

चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या घटनेनंतर तृणमूल काँग्रेसने एक निवेदन जारी करत या हत्येच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Suvendu Adhikari PA Chandranath Rath Murder

सुवेंदू अधिकारींनी काय प्रतिक्रिया दिली?

“दोन ते तीन दिवस रेकी करुन चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. जी घटना घडली ती अत्यंत क्लेशदायक आहे. सुनियोजित कट रचून चंद्रनाथ रथ यांची हत्या केली गेली आहे. दिल्लीतल्या भाजपा नेत्यांशी, आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशीही आमची चर्चा झाली. ही घटना अत्यंत दुःखदायक आहे असं त्यांनीही सांगितलं. त्यांनाही धक्का बसला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही याबाबत माहिती घेतली. आम्ही चंद्रनाथ रथ यांच्या कुटुंबाच्या पाठिशी आहोत. विविध आमदारही आमच्या साथीला आले आहेत. पोलीस त्यांच्या परिने तपास करत आहेत. त्यांच्या हातात काही धागेदोरे आले आहेत. महाजंगलराज १५ वर्षे सुरु होतं. त्याची फळं आता आमच्या माणसांनाही भोगावी लागत आहेत. भाजपा या सगळ्यांचा सफाया करणार आहे”, असं सुवेंदू अधिकारींनी म्हटलं आहे.