पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीच्या रात्री हवाई हल्ला केला. एअर मार्शल चंद्रशेखरन हरी कुमार यांनी या हवाई हल्ल्याची सर्व सुत्रे संभाळली. हल्ला यशस्वी झाल्यानंतर दोनच दिवसांनी ते निवृत्त झाले. या हल्ल्याचा कोणाला संशय येऊ नये म्हणून मी रात्री १२ वाजता घरी जाऊन वाढदिवसाचा केक कापल्याची आठवण सेवानिवृत्त झालेल्या हरी कुमार यांनी ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितली. केक कापून पुन्हा हरी कुमार नियंत्रण कक्षामध्ये आले आणि त्यांनी एअरस्ट्राइकची सुत्रे हाती घेतली. ‘रात्री ३ वाजून २८ मिनिटांनी सुरु झालेली ही मोहीम अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण करुन भारतीय हवाई दलाची विमाने चार वाजता परत आली. आपल्या ३९ वर्षांच्या सेवेतील शेवटचे १५ दिवस सर्वात रोमांचक होते,’ असंही हरी कुमार यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

हरी कुमार यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राइकबद्दल अनेक खुलासे केले. अगदी १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या बालाकोट हल्ल्यानंतर झालेल्या बैठकींपासून ते हल्ल्याचा क्षण आणि त्यानंतर काय झाले या सर्वच गोष्टींची माहिती हरी कुमार यांनी दिली. एअरस्ट्राइक करण्याची कल्पना ही हवाई दल प्रमुखांची होती असंही हरी कुमार यांनी सांगितले. ‘१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे हल्ला झाला तेव्हा हवाई दल प्रमखांचे आणि माझे बोलणे झाले होते. त्यावेळेस हवाई दलाची मदत घेतली जाईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त करत आपल्याकडे काहीतरी योजना हवी असं म्हटलं होतं. त्यानंतर झालेल्या बैठकीमध्येच त्यांनी एअरस्ट्राइकची कल्पना मांडली,’ असं हरी कुमार यांनी सांगितले. तसेच हल्ला कुठे करायचा आहे याची माहिती आम्हाला सात दिवस आधी देण्यात आल्याचे कुमार यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले.

त्या रात्री काय घडले

२५ फेब्रुवारीची रात्र ते २६ फेब्रुवारीच्या पहाटे दरम्यान काय झाले याबद्दलही हरी कुमार यांनी सांगितले. ‘२६ फेब्रुवारीला माझा वाढदिवस असतो. एकीकडे वाढदिवस तर दुसरीकडे डोक्यात एअरस्ट्राइकचा विचार अशी परिस्थिती तेव्हा होती. मी दोनच दिवसांने निवृत्त होणार असल्याने त्याच रात्री एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेबद्दल कोणाला शंका येऊ नये म्हणून ती पार्टी रद्द करण्यात आली नाही. मी त्या पार्टीमध्ये वेटरला मला लाइम कॉर्डियल (फळांचा सर आणि साखर असलेले मद्यविरहीत पेय) चा डबल डोस असलेले पेय देण्यास सांगितले. मी व्हिस्की पीत असल्याचे इतरांना वाटावे म्हणून मी ही शक्कल लढवली होती. या पार्टीमध्ये जवळजवळ ८० अधिकारी होते. त्यावेळेस हवाई दल प्रमुख धनोआ मला लॉनवर घेऊन गेले. मला त्यांनी हल्ल्याच्या तयारीबद्दल विचारले. तसेच मोहिम यशस्वी झाल्याचे फोनवरुन कळवताना केवळ ‘बंदर’ एवढचं बोलण्यास सांगितले. त्या पार्टीनंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर एक महत्वाचं काम असल्याचं सांगून मी नियंत्रण कक्षात आलो. या मोहिमेची माहिली हवाई दल प्रमुखांना द्यायची होती. जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या थेट संपर्कात होते. अचानक मला रात्री १२ वाजता वाढदिवस साजरा करण्यासाठी तुमचे मित्र घरी केक घेऊन आले आहेत असा पत्नीचा मेसेज आला. कोणालाच मोहिमेबद्दल संशय येऊ नये म्हणून मी घरी गेलो. सर्वांबरोबर मी तिथे केक कापून वाढदिवस साजरा केला आणि नियंत्रण कक्षात परत आलो,’ अशी माहिती हरी कुमार यांनी दिली.