ममता बॅनर्जी यांचा भवानीपूरमध्ये पराभव करणारे सुवेंदू अधिकारी हे भाजपाचे पश्चिम बंगालमध्ये जायंट किलर ठरले. दरम्यान सुवेंदू अधिकारींच्या स्वीय सचिवाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. चंद्रनाथ रथ असं त्यांचं नाव आहे. ममता बॅनर्जींचा निवडणुकीत जो पराभव झाला त्यात चंद्रकांत रथ यांचा सिंहाचा वाटा होता. यानंतर आता भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुवेंदू अधिकारी नेमकं काय म्हणाले?

दोन ते तीन दिवस रेकी करुन चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. जी घटना घडली ती अत्यंत क्लेशदायक आहे. सुनियोजित कट रचून चंद्रनाथ रथ यांची हत्या केली गेली आहे. दिल्लीतल्या भाजपा नेत्यांशी, आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशीही आमची चर्चा झाली. ही घटना अत्यंत दुःखदायक आहे असं त्यांनीही सांगितलं. त्यांनाही धक्का बसला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही याबाबत माहिती घेतली आहे. आम्ही चंद्रनाथ रथ यांच्या कुटुंबाच्या पाठिशी आहोत. विविध आमदारही आमच्या साथीला आले आहेत. पोलीस त्यांच्या परिने तपास करत आहेत. त्यांच्या हातात काही धागेदोरे आले आहेत. महाजंगलराज १५ वर्षे सुरु होतं. त्याची फळं आता आमच्या माणसांनाही भोगावी लागत आहेत. भाजपा या सगळ्यांचा सफाया करणार आहे असं सुवेंदू अधिकारींनी म्हटलं आहे.

चंद्रनाथ रथ यांची हत्या कशी करण्यात आली?

चंद्रनाथ रथ हे त्यांच्या कारमधून जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. चारपैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. संशयितांनी त्यांच्या कारचा पाठलाग केला. कारचा वेग कमी होताच त्यांनी रथ यांच्यावर हल्ला करण्यात आला. चंद्रनाथ रथ, सुवेंदू यांच्याबरोबर गेली अनेक वर्षे काम करत होते. अधिकारी यांच्या राजकीय समन्वयाचं काम ते पाहत असत. चंद्रनाथ रथ यांच्याबरोबर असलेले बुद्धदेब हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चंद्रनाथ रथ स्वत: गाडी चालवत होते. हल्ला झाला तेव्हा ते सुवेंदू यांच्याबरोबर नव्हते. भाजपा नेते दिव्येंदू अधिकारी यांनी या हल्ल्याच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकेबंदी करुन हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांकडून आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांच्या गाडीचा पाठलाग करुन त्यांना रस्त्यात थांबवले. यानंतर हल्लेखोरांकडून बेछूटपणे जवळपास १२ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी चार गोळ्या चंद्रनाथ रथ यांना लागल्या.

कोण होते चंद्रनाथ रथ?

  • चंद्रनाथ रथ हे केवळ भाजपचे कार्यकर्ते नव्हते, तर सुवेंदू अधिकारी यांच्या कोअर टीममधील एक महत्त्वाचे नाव होते.
  • गेल्या ५ वर्षांपासून सुवेंदू अधिकारी यांच्या सर्व राजकीय हालचाली, बैठका आणि संघटनात्मक बांधणीची जबाबदारी चंद्रनाथ रथ यांच्याकडे होती.
  • उत्तर २४ परगणा या जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे घट्ट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता, ज्यामुळे ते अनेक राजकीय विरोधकांच्या डोळ्यात खुपत होते, असा दावा भाजप समर्थकांकडून केला जात आहे.

फॉरेन्सिक तपास आणि पोलीस कारवाई

रथ यांच्या हत्येच्या घटनेनंतर उत्तर २४ परगणा जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. या गाडीच्या विंडशील्डवर गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. बंगालमधील वातावरण प्रचंड तापले आहे. “माझ्या सहकाऱ्याची हत्या करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी दिली आहे. भाजप नेत्यांनी रात्री उशिरापर्यंत मध्यमग्राममध्ये गर्दी केली होती. या घटनेचा तृणमूल काँग्रेसने निषेध व्यक्त केला आहे. “आम्ही चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तीव्र निषेध करतो. लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही. या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी व्हावी, जेणेकरून खरे गुन्हेगार समोर येतील.” अशी प्रतिक्रिया टीएमसीने दिली आहे.