विरोधी बाकांवर असताना आक्रमक राजकारण करणाऱ्यांना सत्तेत आल्यानंतर कशाप्रकारे शहाणपण येते, याचे प्रत्यंतर नुकतेच उत्तर प्रदेशात पार पडलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यकर्त्यांना आपण आता सत्ताधारी आहोत याचे भान ठेवून वागा, असा सल्ला दिला. कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेता कामा नये. आपण सत्ताधारी आहोत याचे भान ठेवून स्वत:ची मानसिकता बदलायला पाहिजे. आपण जेव्हा इतरांचे वर्तन कायदेशीर असावे, अशी अपेक्षा करतो तेव्हा आपण स्वत:ही कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. तुम्हाला काही वावगे आढळले तर सरकारला ती गोष्ट लक्षात आणून द्या, असे योगी आदित्यनाथ यांनी भाजप नेत्यांना सांगितले. जर कुठे एखादी त्रुटी असेल तर सरकार ती दूर करेल. आम्ही कधीही तुमच्या भावना दुखावणार नाही. मात्र, आता आपल्याला कुठेतही स्वत:ची मानसिकता बदलण्याची गरज आहे. आता आपण विरोधक राहिलो नसून, सत्तेत आलो आहोत, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

सहारनपूर आणि आग्रा येथे काही दिवसांपूर्वी भाजप व बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलिसांना भिडले होते. तसेच गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेशात स्वयंघोषित गोरक्षकांचा उपद्रवही वाढला आहे. याशिवाय, नुकत्याच झालेल्या एका बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी स्वयंसेवकांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांचे हे विधान सूचक मानले जात आहे.

भाजप सरकारची स्थापना ही उत्तर प्रदेशातील जातीय राजकारण, घराणेशाही, तुष्टीकरण याविरोधातील चळवळीची सुरूवात आहे. आगामी काळात राष्ट्रवाद आणि विकास हाच येथील राजकारणाचा केंद्रबिंदू राहील, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. याशिवाय, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनीदेखील भाजपची भूमिका स्पष्ट केली. आम्ही कार्यकर्त्यांच्या सन्मानाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. मात्र, कार्यकर्त्यांनीही आपल्याकडून सरकारविरोधी कृती होणार नाही, याबद्दल काळजी घ्यावी, असे मौर्य यांनी सांगितले.