२०० गुणांची प्रश्नपत्रिका, प्रश्न निवडण्याची मुभा

मुंबई : राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) प्रश्नपत्रिकेच्या रचनेत बदल करण्यात आला असून आता २०० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात येणार असून त्यातील १८० गुणांचे प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यात परीक्षेसाठी चार शहरेही वाढवण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीटमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र या विषयांचे मिळून १८० प्रश्न विचारण्यात येत होते. सर्व प्रश्न सोडवणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक होते. मात्र यंदा या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. एकूण २०० गुणांची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून त्यातील १८० गुणांचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत. प्रत्येक विषयासाठी पाच गुणांचे वैकल्पिक प्रश्न असतील. दरम्यान, परीक्षेचा अभ्यासक्रम गेल्या वर्षीप्रमाणेच असणार आहे.

देशभरात १२ सप्टेंबर रोजी नीट होणार असून त्याचे अर्ज मंगळवारपासून उपलब्ध झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत मुदत आहे.

बदल काय?

प्रत्येक विषयासाठी आतापर्यंत ४५ गुणांचे प्रश्न विचारण्यात येत होते. त्याऐवजी आता ५० गुणांचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. प्रत्येक विषयाचे प्रश्न अ आणि ब अशा दोन गटांत विभागणी करून विचारण्यात येतात. त्यातील ब गटात १५ गुणांचे प्रश्न विचारण्यात येणार असून त्यातील १० गुणांचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत.

महाराष्ट्रात चार नवी केंद्रे

यंदा अंतराचे निकष पाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जवळचे केंद्र उपलब्ध व्हावे म्हणून परीक्षा केंद्रांची संख्या वाढण्यात आली असून देशभरात ३ हजार ८६२ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. देशातील १९८ शहरांमध्ये परीक्षेचे केंद्र असेल. राज्यात सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नगर या चार शहरांमध्येही आता नीटचे केंद्र असेल. राज्यात एकूण २२ केंद्रांवर परीक्षा होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in the question paper structure of neet zws
First published on: 14-07-2021 at 03:35 IST