आपल्या कारस्थानाचा भाग म्हणून दलित मते बळकावण्यासाठी काँग्रेसने चरणजितसिंग चन्नी यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनवले असल्याचा आरोप भाजपने सोमवारी केला. या समाजातील एखाद्या नेत्याला पक्षाने महत्त्वाची पदे फारच थोड्या कालावधीसाठी दिल्याची इतिहासातील उदाहरणेही पक्षाने यासाठी दिली.

दलितांच्या भल्याबाबत काँग्रेस प्रामाणिक असेल, तर पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये चन्नी हे आपले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील असे जाहीर आश्वासन त्या पक्षाने द्यावे, असे आव्हान भाजपने दिले. काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुका प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली लढवेल, या हरीश रावत यांच्या विधानाकडे लक्ष वेधून, पक्षाचे पंजाब प्रभारी असलेले भाजपचे सरचिटणीस दुष्यंतकुमार गौतम यांनी काँग्रेसवर टीका केली. दलितांची मते बळकावण्यासाठी पंजाबमध्ये कारस्थान शिजवले जात आहे’, असे गौतम म्हणाले.

काँग्रेसने विविध राज्यांतील दलित नेत्यांना मुख्यमंत्री बनवले, मात्र थोड्या कालावधीतच त्यांना हटवले असे सांगताना गौतम यांनी महाराष्ट्र व राजस्थान यांची उदाहरणे दिली. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कधीही भारतरत्न दिले नाही, त्यांच्या नावाने स्मारक उभारले नाही किंवा त्यांची स्मृती राखण्यासाठी काहीच केले नाही, असा दावा त्यांनी केला.

काँग्रेसचा ‘निवडणूक स्टंट’- मायावती

लखनऊ : पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री म्हणून चरणजितसिंग चन्नी यांची निवड हा काँग्रेसचा ‘निवडणूक स्टंट’ असल्याचे सांगून, दलितांनी यापासून सावध राहावे असा सल्ला बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी सोमवारी दिला.

पंजाब विधानसभेच्या निवडणुका चन्नी यांच्या नव्हे तर दलितेतर व्यक्तीच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, हे मला माध्यमांतून आजच कळले, असे मायावती यांनी पत्रकारांना सांगितले. पंजाब असो, उत्तर प्रदेश असो किंवा इतर कुठले राज्य असो; ‘जातीयवादी पक्ष’ दलितांना व ओबीसींना जे काही देत आहेत, ते दलितांची उन्नती करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या मतांसाठी, तसेच स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी आहे, अशी टीका मायावती यांनी केली.

त्यांच्या पक्षाने पंजाब विधानसभेच्या आगामी निवडणुकांत शिरोमणी अकाली दलाशी युती केली आहे.