देशातील करोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत असल्याचे दिसत असताना अनेक राज्यांमध्ये विविध गोष्टींवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. करोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दरम्यान, आता अनेक दिवसांपासून बंद असलेली चारधाम यात्रा आजपासून (१८ सप्टेंबर) सुरू होणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शुक्रवारी ही घोषणा केली आहे.चारधाम यात्रेला दिलेली स्थगिती उठवतानाच, करोनाविषयक नियमांचे कठोर पालन करून ही यात्रा पार पाडावी, असे निर्देश उत्तराखंड उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिलेले आहेत.

जवळपास चार महिन्यांनी शनिवारपासून चारधाम यात्रा सुरू होत आहे. शुक्रवारी उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी सर्वसमावेशक कार्य पद्धती (एसओपी) जारी केली आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम येथे दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरूंना नोंदणी केल्यानंतर ई-पास जारी केले जातील. त्यानंतरच चारधाममध्ये दर्शनासाठी परवानगी दिली जाईल.

तसेच बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनाही स्मार्ट सिटी पोर्टलवर अनिवार्य नोंदणी करावी लागेल. कोविड लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनी, या प्रमाणपत्रावर प्रवासाला परवानगी दिली जाईल. पण केरळ, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी दोन्ही डोस घेतल्यानंतर, कोविड चाचणीच्या ७२ तास आधी नकारात्मक अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे.

सचिव धर्मस्वा हरिचंद्र सेमवाल यांनी चारधाम यात्रेसाठी एसओपी जारी केली आहे. दरम्यान, चारधाम देवस्थानम व्यवस्थापन मंडळानेही एसओपी जारी केली आहे. दोन्ही एसओपींमध्ये समान तरतुदी आहेत. चारधाममधील यात्रा १८ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. बाहेरून आणि राज्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

धामांना भेट देण्यासाठी प्रवाशांना प्रथम देवस्थानम बोर्डाच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर देवस्थानम बोर्डाद्वारे दररोज मर्यादित संख्येने ई-पास जारी केले जातील. मंदिर परिसरातील मुख्य गेटवर दर्शन घेण्यापूर्वी प्रवाशांचा ई-पास तपासला जाईल.

‘चारधाम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमालयातील या प्रसिद्ध मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या दैनंदिन संख्येवर न्यायालयाने मर्यादा घातली आहे. केदारनाथ धाममध्ये दररोज ८००, बद्रीनाथ धाममध्ये १२००, गंगोत्रीत ६००, तर यमुनोत्रीत ४०० भाविकांना प्रवेश दिला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. मंदिरांभोवती असलेल्या कुंडांमध्ये स्नान करण्याची यात्रेकरूंना परवानगी दिली जाणार नाही असेही न्यायालयाने सांगितले.

दरम्यान, आपत्कालीन परिस्थिती वगळता सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना त्यांचे फोन बंद ठेवण्याचे निर्देश देहराडून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नियमांचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल असेही आदेश देण्यात आले आहेत. कोविड १९,  भूस्खलन आणि इतर अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.