Charges 13 people including Ashish Mishra Next hearing Lakhimpur Kheri violence case December 16 ysh 95 | Loksatta

आशिष मिश्रासह १३ जणांविरुद्ध आरोप निश्चित; लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी १६ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी

आशिष मिश्रा हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. चार शेतकरी आणि पत्रकाराच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणी १४ आरोपींवर खटला चालवला जाणार आहे.

आशिष मिश्रासह १३ जणांविरुद्ध आरोप निश्चित; लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी १६ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

पीटीआय, लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश) : लखीमपूर खेरी येथे ऑक्टोबर २०२१ मध्ये आंदोलक शेतकऱ्यांना मोटारीची धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी येथील न्यायालयाने मंगळवारी केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि इतर १२ जणांविरुद्ध आरोप निश्चित केले. खून, गुन्हेगारी कट, नासधूस व संबंधित गुन्ह्यांप्रकरणी हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आशिष मिश्रा हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. चार शेतकरी आणि पत्रकाराच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणी १४ आरोपींवर खटला चालवला जाणार आहे.

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुनील कुमार वर्मा यांनी पुढील सुनावणी १६ डिसेंबर रोजी निश्चित केली आहे, असे फौजदारी सरकारी वकील अरविंद त्रिपाठी यांनी सांगितले. त्रिपाठी म्हणाले, की आशिष मिश्रासह १३ आरोपींवर भारतीय दंडसंहितेच्या कलम १४७ आणि १४८ (दंगल), १४९ (बेकायदेशीर सभा), ३०२ (हत्या), ३०७ (हत्येचा प्रयत्न), ३२६ (धोकादायक शस्त्रांनी गंभीर दुखापत करणे) , ४२७ (दुर्घटना) आणि १२० ब (गुन्हेगारी कटासाठी शिक्षा), व मोटार वाहन कायदा कलम १७७ अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

अन्य १२ आरोपींमध्ये अंकित दास, नंदनसिंग बिश्त, लतीफ काळे, सत्यम उर्फ सत्यप्रकाश त्रिपाठी, शेखर भारती, सुमित जैस्वाल, आशिष पांडे, लवकुश राणा, शिशू पाल, उल्लास कुमार उर्फ मोहित त्रिवेदी, रिंकू राणा आणि धर्मेद्र बंजारा यांचा समावेश आहे. हे सर्वजण सध्या कोठडीत आहेत. १४ वा आरोपी वीरेंद्र शुक्ला जामिनावर बाहेर आहे. त्याच्यावर कलम २०१ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे किंवा दिशाभूल करणारी माहिती देण्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपी व्यक्तीविरुद्ध फिर्यादी पक्षाला नेमके काय सिद्ध करायचे आहे, हे लांगण्यासाठी आरोप निश्चिती केली जाते.

आशिष मिश्रा, अंकित दास, नंदन सिंग बिश्त, सत्यम उर्फ सत्य प्रकाश त्रिपाठी, लतीफ काळे आणि सुमित जैस्वाल यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखालीही आरोप निश्चित करण्यात आले आहेत, असे त्रिपाठी यांनी सांगितले. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या या भागातील दौऱ्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत असताना उसळलेल्या हिंसाचारात लखीमपूर खेरीमधील टिकुनिया येथे आठ जण ठार झाले होते.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेश पोलिसांनी नोंदवलेल्य गुन्ह्यानुसार एका मोटारीने (एसयूव्ही) धडक देऊन चार शेतकऱ्यांना पाडले. या मोटारीत आशिष मिश्रा बसले होते. या घटनेनंतर, संतप्त शेतकऱ्यांनी मोटारचालक व भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या हिंसाचारात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 00:02 IST
Next Story
आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन