नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) शुक्रवारी ‘अॅम्नेस्टी इंडिया’ आणि त्याचे माजी प्रमुख आकार पटेल यांच्याविरुद्ध परकीय चलन विनिमिय कायद्यानुसार ६२ कोटींच्या व्यवहारप्रकणी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. त्यानंतर संचालनालयाने शनिवारी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोपपत्र अॅम्नेस्टी इंडिया’सह काही संस्थांविरुद्ध दाखल केले.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन्स फॉर अॅम्नेस्टी इंटरनॅशनल ट्रस्ट आणि इतरांविरुद्ध बंगळुरू शहरातील न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने निवेदनात म्हटले आहे, की न्यायालयाने गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी कलमांखाली दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली आणि आरोपींना ‘समन्स’ जारी केले आहेत.‘ईडी’ने केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, ज्यावर नंतरच्या एजन्सीने विदेशी योगदान नियमन कायदा, दंडसंहितेतील कलम उल्लंघनप्रकरणी गुन्हा दाखल केला.
