कर्नाल लाठीमाराची न्यायालयीन चौकशी

गेल्या महिन्यात कर्नाल येथे शेतकरी व पोलीस यांच्यात झालेल्या संघर्षाच्या न्यायालयीन चौकशीचा आदेश देतानाच, दोन्ही बाजूंतील वादाचे केंद्र ठरलेल्या सनदी अधिकाऱ्याला रजेवर पाठवण्याचा निर्णय हरियाणा सरकारने शनिवारी घेतला. यामुळे कर्नाल जिल्हा मुख्यालयाबाहेर सुरू असलेले आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेतले.

निवृत्त न्यायाधीशांमार्फत ही चौकशी केली जाईल व ती एका महिन्याच्या आत पूर्ण करण्यात येईल, असे हरियाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव देवेंद्र सिंह यांनी सांगितले. माजी उपविभागीय दंडाधिकारी आयुष सिन्हा हे या कालावधीत रजेवर असतील, असेही ते म्हणाले.

आंदोलक शेतकरी व प्रशासन यांच्यात समझोता झाल्यानंतर हरियाणा सरकारचे अधिकारी व शेतकरी नेते गुरनामसिंग चादुनी यांनी कर्नालमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यानंतर कर्नालमधील तिढा संपला. जिल्हा मुख्यालयाबाहेरील शेतकऱ्यांचे धरणे मागे घेण्यात येईल, असे चादुनी यांनी यावेळी सांगितले.

हा प्रश्न सोडवण्यासाठी दीर्घकाळ चाललेली बैठक सौहार्दाच्या वातावरणत झाल्याचे दोन्ही बाजूंनी म्हटल्यानंतर, शेतकरी व कर्नाल प्रशासन यांच्यातील तिढा सुटण्याची चिन्हे शुक्रवारी सायंकाळीच मिळाली होती.

२८ ऑगस्टला भाजपची बैठक उधळून लावण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांचा कर्नाल येथे संघर्ष होऊन सुमारे १० आंदोलक जखमी झाले होते. शेतकऱ्यांनी सीमा ओलांडल्यास त्यांची ‘डोकी फोडा’ असे आयएएस अधिकारी आयुष सिन्हा यांनी म्हटल्याचे चित्रीकरण कॅमेऱ्यात झाले होते. सिन्हा यांना निलंबित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केल्यानंतर त्यांची कर्नालबाहेर बदली करण्यात आली होती.